ठाणे, पुणे, उस्मानाबाद, मुंबई उपनगर, सांगली, कोल्हापूरची विजयी घोडदौड

ठाणे, पुणे, उस्मानाबाद, मुंबई उपनगर, सांगली, कोल्हापूरची विजयी घोडदौड….!!!!!

जळगाव : महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र खो -खो असोसिएशन यांच्या सहकार्याने जळगांव येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022-23 सुरू असून खो-खो स्पर्धेत पुरुष गटात ठाणे, पुणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर तर महिला गटात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर, सांगली संघांनी विजयी वाटचाल सुरु ठेवली आहे.

जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या खो-खो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात झालेल्या साखळी सामन्यात महिलांमध्ये पुणे संघाने मुंबईचा (13-9) असा 1 डाव 4 गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे भाग्यश्री बडे (2.00, 1.30 मि. संरक्षण व 1 गुण ), साक्षी करे (2.00, 1.30 मि. संरक्षण ), कोमल धारवाडकर (3.00 मि. संरक्षण), दीपाली राठोड (4 गुण) यांनी चांगला खेळ केला. तर मुंबई तर्फे काजल दिवेकर (1.00 मि. संरक्षण ), संजना कुडव (1.40 मि. संरक्षण व 2 गुण), प्राजक्ता ढोबळे (4 गुण) यांनी खेळ केला मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही.

दुसऱ्या सामन्यात सांगलीने अमरावतीचा 12-4 असा 1 डाव 8 गुणांनी पराभव केला. यात सानिका चाफे (4.00 मि. संरक्षण ), प्रतीक्षा बिराजदार (5.00 मि. संरक्षण ) व सानिका सुतार (2.30 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. अमरावतीकडून प्रशिका खंडारे (1.50 मि. संरक्षण ) हिने एकाकी लढत दिली.

पुरुष गटात ठाण्याने सांगलीचा 2 गुण व 3 मि. 30 सेकंद राखून ( 23-21) पराभव केला. संकेत कदम (1.40 मि. संरक्षण व 3 गुण), गजानन शेंगाळ (1.40 मि. संरक्षण ), आकाश तोगरे (1.10, 1.00 मि. संरक्षण व 1 गुण ), जितेश म्हस्कर (1.00, 1.00, 1.10 मि. संरक्षण व 5 गुण) यांनी चांगला खेळ केला. सांगलीकडून आतिक शेख (1.10 मि. 1.10 मि. संरक्षण व 1 गुण ), मल्लिकार्जुन (1.00 व 2 गुण) यांनी बरा खेळ केला.

—–
शासनाने घेतलेल्या या राज्य ऑलिम्पिक स्पर्धेमुळे नवीन खो- खो खेळाडूंना चांगली स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. यामधून भविष्यात महाराष्ट्राला आणि देशाला दर्जेदार खेळाडू मिळतील.

– ॲड. गोविंद शर्मा, सचिव महाराष्ट्र खो-खो संघटना
—————

 

————–
राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपल्या जिल्ह्याचे नाव उचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भारतीय खोखो महासंघ खो-खो ऑलिम्पिक मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहे.

– डॉ. चंद्रजित जाधव, सहसचिव, भारतीय खो-खो महासंघ
—-
चौकट

स्पर्धा निश्चित झाल्यानंतर क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पर्धा नियोजन बैठकीत दिलेल्या सुचना तसेच जिल्हाधिकारी अमन मित्तल
यांनी क्रीड़ा संघटनांच्या बैठकीत केलेल्या सुचनानुसार खेळाडुना जळगाव येथे दर्जेदार मैदान आणि अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खोखो स्पर्धे करीता अंतराष्ट्रीय दर्जाचे मॅटवरील मैदान तयार करणे व विद्युत झोतातील सामने आयोजन करण्या मध्ये महाराष्ट्र राज्य खोखो संघटना व जळगाव जिल्हा खोखो संघटना यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे, असे जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी सांगितले.

जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत,क्रीडा अधिकारी तथा एकलव्य पुरस्कारप्राप्त माजी राष्ट्रीय खेळाडू गुरुदत्त चव्हाण,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशु पोळ,जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील,दिलीप चौधरी,दत्तात्रय महाजन,अनिल माकडे,सुशांत जाधव,प्रेमचंद चौधरी व इतर आजी-माजी खेळाडू मेहनत घेत आहेत.