चोपडा महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या सात विद्यार्थ्यांची आर्मी सेवेत निवड

चोपडा महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या सात विद्यार्थ्यांची आर्मी सेवेत निवड

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातर्फे आर्मी सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना लेफ्टनंट डॉ.बी.एम. सपकाळ यांनी मागील काही वर्षापासून एन.सी.सी.चे विद्यार्थी हे राष्ट्रीय कॅम्प मध्ये कशाप्रकारे सहभाग नोंदवित आहेत व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नोकर भरतीमध्ये कसा होतो याविषयी माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विविध क्षेत्रात महाविद्यालयाचे विद्यार्थी नोकरी करिता प्रविष्ट होत आहेत ही आनंदाची बाब आहे व यात महाविद्यालयाने पुरविलेल्या सोई-सुविधांचा पुरेपूर वापर विद्यार्थी करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक सदैव प्रयत्नशील असतात व त्या अनुषंगानेच महाविद्यालयाची वाटचाल प्रगतीपथाकडे होत आहे ही महत्वपूर्ण गोष्ट आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी आर्मी सेवेत निवड झालेल्या एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले.यावेळी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, राष्ट्रीय छात्रसेना फक्त आर्मी सेवेत भरती होण्याकरिता नाही तर स्वतःचे व्यक्तिमत्व विकास घडविण्याकरिता उभी केलेली जगातील सर्वात मोठी युथ ऑर्गनायझेशन आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक असमतोल दूर होत आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे ही गौरवाची बाब आहे. महाविद्यालयातील एन.सी.सी. विभाग नेहमी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व सैन्य प्रशिक्षणावर भर देत आहे ही अत्यंत महत्वाची बाब आहे, या शब्दात विद्यार्थ्यांचे व विभागाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.साधना प्रवीणकुमार निकम या विद्यार्थिनीची निवड एअर होस्टेज म्हणून इंडिगो एअरलाइन या कंपनीत झाली त्याबद्दल संस्थेचे सचिव ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला तसेच एन.सी.सी. विभागातील कु. प्रसाद श्रीराम शिरसाट, कु. मयूर राजेंद्र महाजन, कु. स्वप्नील भारत पाटील, कु. विशाल एकनाथ पाटील, कु. रामचंद्र अरुण धनगर, कु. राहुल संतोष खैरनार व कु. राहुल दिलीप पाटील या विद्यार्थ्यांची निवड सैन्य भरती करिता झाली त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील तसेच प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ.के. एस.भावसार, डॉ.एस.आर. पाटील व प्रा.एम.ए.पाटील यांनी सहकार्य केले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.