ऐतिहासिक कादंबऱ्या व वात्रटिका वाचनामुळे मिळाली साहित्य लेखनाची प्रेरणा- कादंबरीकार चंदन पवार

ऐतिहासिक कादंबऱ्या व वात्रटिका वाचनामुळे मिळाली साहित्य लेखनाची प्रेरणा- कादंबरीकार चंदन पवार

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे दि.२७ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन’ व ‘कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवस’ यानिमित्ताने कादंबरीकार चंदन पवार यांचे ‘माझं साहित्य असं जन्माला आलं’ या विषयावरील व्याख्यान, तसेच ‘काव्य वाचन’, ‘वक्तृत्व स्पर्धा’ व ‘विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण’ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन ‘कविवर्य कुसुमाग्रज’ तसेच ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ.के.एन.सोनवणे, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, वडगाव येथील साहित्यिक व कादंबरीकार चंदन पवार, किरण लोहार, सौ.एम.टी.शिंदे , विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ, डॉ.ए. बी.सूर्यवंशी व रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यानी मराठी भाषा वाचविण्यासाठी बोलीभाषेत व्यवहार करायला हवा.बोली टिकल्या तरच भाषा जगतील. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा संवर्धनाची गोडी निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना साहित्यिक, कवी व लेखक यांची ओळख निर्माण करून देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे’.
याप्रसंगी वक्त्यांचा परिचय सौ. एम. टी. शिंदे यांनी करून दिला.
यावेळी चंदन पवार ‘माझं साहित्य असं जन्माला आलं’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘ मराठी भाषेची अक्षरे जगभरात पोचून मराठीचा प्रचार आणि प्रसार सर्वांनी करायला हवा. आपली बोलीभाषा व्यवहारात सातत्याने वापरली तरच मराठी भाषेचे संवर्धन होण्यास मदत होईल.यावेळी त्यांनी आपल्या ‘शिवबा’ या काव्यसंग्रह व ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या कादंबरीच्या लेखन प्रेरणा कथन करतांना सांगितले की, मराठीतील प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबऱ्यांचे, वात्रटिकांचे तसेच कवितांचे वाचन केल्याने वास्तववादी साहित्य लेखनाची प्रेरणा मिळाली. यावेळी त्यांनी ‘फिर भी हम एक है’, ‘व्हॅलेन्टाईन’, ‘बळीची इडापीडा’, ‘स्त्रीभृण हत्या’ या कवितांचे सादरीकरण केले.यावेळी त्यांनी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी कविता माळी, हर्षदिव्या सोनवणे व माधुरी पाटील या विद्यार्थिनींनी मराठी भाषा संवर्धन व उपाययोजना यावर मनोगत व्यक्त केले. तसेच कोळी अक्षय याने ‘तुला उचलून घ्यायचं हाय रं’ व ‘उनमा तानमा जाऊ नको, मोहिनी पाटील हिने ‘मौन’, प्रवीण कहाणे याने ‘स्पर्श आठवणींचा व ‘चिडी’ तसेच कविता माळी हिने ‘वावरमा राबी देख’ इत्यादी विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण केले.
याप्रसंगी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने मराठी विभागातर्फे आयोजित ‘निबंध’, ‘स्वलिखित काव्यलेखन’, ‘वक्तृत्व’, ‘कविता गायन’, ‘उखाणे’, ‘पोस्टर’ ‘शब्द संपदा’, घोषवाक्य स्पर्धा, ‘उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला व पोस्टर स्पर्धा व शुद्धलेखन स्पर्धा’ तसेच ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त’ आयोजित ‘निबंध’, ‘बोलीभाषा काव्य लेखन’ व ‘वक्तृत्व स्पर्धेत’ प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र व वाचन संस्कृती रुजावी व भाषा संवर्धन व्हावे उद्देशाने विविध पुस्तके भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘मराठी भाषा गर्व वाटावी अशी आहे.आपले चालणं, बोलणं, व्यक्त होणं हे मराठी भाषेतूनच होते म्हणून भाषेवर प्रेम करावे. भाषा जिवंत ठेवण्याचे काम बोली भाषिक करतात.भाषांची सरमिसळ होऊनही मराठीचे अस्तित्व आबाधित आहे ही गोष्ट महत्त्वाची वाटते.विचार व्यक्त करण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी स्थानिक बोलीचा वापर करावा तरच मराठी भाषा जगेल. मराठी ही ज्ञानभाषा व शासन व्यवहाराची भाषा झाली पाहिजे.मराठी भाषेत विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी वाचन व त्याचा व्यवहारातील वापर वाढविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एम. एल.भुसारे यांनी केले तर आभार जी. बी. बडगुजर यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी डी.पी.सपकाळे, डी. एस.पाटील, डी.डी.कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील, वाय.एन.पाटील, एम. बी. पावरा, चेतन बाविस्कर, शाहीन पठाण आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन.बी.पाटील, सौ.पुष्पा दाभाडे, एस.जी.पाटील, जी.बी. बडगुजर इत्यादींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.