महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर समाजाला पुढे नेण्याची गरज ॲड.भाग्यश्री महाजन

महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर समाजाला पुढे नेण्याची गरज ॲड.भाग्यश्री महाजन

पाचोरा दि. 8 – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने *जागतिक महिला दिनानिमित्त* पाचोरा शहरातील ख्यातनाम विधीतज्ञ व सामाजिक क्षेत्रात महिला सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या मा. ॲड. भाग्यश्री महाजन यांचे *’महिला सुरक्षा व महिला सबलीकरण’* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्या आपल्या व्याख्यानात असे म्हणाल्या की, पूर्वीपेक्षा आज महिला सबलीकरणासाठी समाजाकडून व कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात दिसून येते. अगदी बस चालकापासून तर भारताचे सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी आपापल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. पण तरीदेखील मला असे वाटते की, आज महिला जरी काही प्रमाणात ‘सबला’ झाली असली तरी महिलांनीच स्वतःच्या कर्तृत्वावर समाजाला पुढे नेण्याची गरज आहे. कारण महिला दोन कुळांचा सांभाळ करून सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य करते असे प्रतिपादन केले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त *’महिला सुरक्षा व महिला सबलीकरण’* या विषयावर रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पाचोरा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पाचोरा नगरपरिषदेच्या नगरसेविका मा. ताईसाहेब सौ. सुचेताताई वाघ व तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षा मा. ताईसाहेब सौ. ज्योतीताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या मा. ताईसाहेब गं. भा. सखुबाई तडवी, कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये समाजाला आरोग्य सेवा देणाऱ्या मा. ताईसाहेब श्रीमती ज्योत्स्ना पाटील, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या आणि गोरगरीब जनतेला मेसची सेवा देणाऱ्या मा. ताईसाहेब श्रीमती मंगलाताई कुलकर्णी व मा. सौ. संगीताताई कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मा. ताईसाहेब सौ. ज्योतीताई वाघ विद्यार्थिनींना उद्देशून म्हणाल्या की, या समाजाच्या उत्थानासाठी विशेष कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा तुमच्यासारख्या विद्यार्थिनींना आदर्श ठरणार आहे. तुम्हाला भविष्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय किंवा कोणत्याही क्षेत्रात कार्य करण्यासाठी आमची सदैव मदत राहीलच असा विश्वास दिला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनींना विविध क्षेत्रात भरारी घेण्यासाठी महाविद्यालय हे एक व्यासपीठ आहे. त्याचा आपल्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्या असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. इंदिरा लोखंडे आणि प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. मेघा गायकवाड व प्रा. प्राजक्ता शितोळे यांनी केला. यावेळी विद्यार्थी विकास विभाग अधिकारी उपप्राचार्य प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, ताईसाहेब सौ. किर्तीताई अहिरे, प्रा. एस. आर. ठाकरे, डॉ. सुनिता गुंजाळ, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. सुनील पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश देशमुख, प्रा. श्वेता देव व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्रांती सोनवणे तर आभार प्रदर्शन प्रा. सुवर्णा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. मच्छिंद्र पाटील, श्री. समाधान पवार, श्री. सुरेंद्र तांबे, श्री. जयेश कुमावत यांनी परिश्रम घेतले.