गौण खनिज प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
सोयगाव (प्रतिनिधी) : दत्तात्रय काटोले
तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी दिलीप बाबुलाल शिंदे व संदीप रामदास इंगळे यांनी बुधवार (दि. ३ जून) पासून तहसील कार्यालय, सोयगाव समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यापूर्वी याच मागण्यांसाठी करण्यात आलेल्या उपोषणादरम्यान प्रशासनाने चौकशीसाठी पंधरा दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र त्यानंतर तब्बल पंधरा महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा चौकशीचा अहवाल समोर आलेला नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
सदर प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि शासनाचा बुडालेला महसूल तात्काळ वसूल करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.
दरम्यान, या आमरण उपोषणास रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अंकुश पगारे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनीही उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शविले.
प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
फोटो, दत्तात्रय काटोले






















