Home महाराष्ट्र सोयगावात आढावा बैठकीत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; अधिकारी गैरहजर राहिल्याने नाराजी

सोयगावात आढावा बैठकीत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; अधिकारी गैरहजर राहिल्याने नाराजी

सोयगावात आढावा बैठकीत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; अधिकारी गैरहजर राहिल्याने नाराजी

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत सोयगाव पंचायत समितीच्या बचत भवन सभागृहात शुक्रवारी (दि. १०) विविध विकास कामांबाबत आढावा बैठक पार पडली. मात्र ही बैठक तब्बल एक तास उशिराने सुरू झाल्याने उपस्थित अधिकारी, लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांना ताटकळत बसावे लागले. यामुळे सुरुवातीपासूनच नाराजीचा सूर उमटला.

अखेर दुपारी चार वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. यावेळी उपाध्यक्ष जैस्वाल, सभापती मोठे, जी.प. सदस्या सुनीता चव्हाण, माहीन मुलतानी, पुष्पा काळे, पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण, उपसभापती गयाबाई घोडे, सदस्य राहुल राठोड, जयश्री पवार तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटविकास अधिकारी एस. आर. यमुलावाड व विस्तार अधिकारी अशोक दौड उपस्थित होते.

बैठकीत जलजीवन मिशन व पाणीपुरवठा योजनांवर चर्चा झाली. तालुक्यात योजना राबविताना मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप नागरिकांनी केला. काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत, काही गावांत विहिरी असूनही पाणी नाही, तर काही ठिकाणी पाणी असूनही योग्य नियोजन नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. “हर घर नळ” योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असूनही कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

अधिकाऱ्यांची दांडी

बैठकीस अनेक अधिकारी गैरहजर राहिल्याने हा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा वचक उरलेला नसल्याचे स्पष्ट केले.

समन्वयाचा अभाव उघड

नागरिकांनी ग्रामसेवक वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार केली. तसेच फोन करूनही कामे होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. काही अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोनही घेत नसल्याचे सदस्यांनी सांगितले.

कारवाईचा इशारा

बैठकीस गैरहजर राहिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लवकरच नोटीस देण्यात येणार असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिला. पुढील दोन महिन्यांत पुन्हा आढावा बैठक घेऊन कामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

महापुरुषांच्या प्रतिमेकडे दुर्लक्ष

बैठकीच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन न करता कार्यक्रम सुरू झाल्यानेही उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

फोटो ओळ : सोयगाव येथील आढावा बैठकीच्या मंचावर उपस्थित मान्यवर व सभागृहातील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी.

Don`t copy text!