Home पाचोरा श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेत दुहेरी पदोन्नती; मच्छिंद्र जाधव उपजिल्हाध्यक्ष तर बंडूभाऊ सोनार...

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेत दुहेरी पदोन्नती; मच्छिंद्र जाधव उपजिल्हाध्यक्ष तर बंडूभाऊ सोनार जिल्हा संघटक – जळगाव मेळाव्यात कामगार हक्कांसाठी आक्रमक लढ्याचा इशारा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेत दुहेरी पदोन्नती; मच्छिंद्र जाधव उपजिल्हाध्यक्ष तर बंडूभाऊ सोनार जिल्हा संघटक – जळगाव मेळाव्यात कामगार हक्कांसाठी आक्रमक लढ्याचा इशारा

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी

शिवसेना प्रणीत श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना यांच्या उत्तर महाराष्ट्र संघटन दौऱ्याची जळगाव येथून दमदार सुरुवात झाली. रविवार (दि. ५ एप्रिल २०२६) रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत संघटनात्मक ताकद, घोषणांचा गजर आणि कामगार हक्कांसाठी लढण्याचा निर्धार यामुळे वातावरण भारावून गेले होते. जिल्हाभरातून शेकडो कामगार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

या महत्त्वपूर्ण बैठकीत संघटनेत दुहेरी पदोन्नती जाहीर करण्यात आली. मच्छिंद्र शिवाजी जाधव (भावडू) यांची जिल्हा उपजिल्हाध्यक्षपदी तर जनसेवक तथा तालुका माझा न्युजचे संपादक बंडूभाऊ केशव सोनार यांची जिल्हा संघटकपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली. या घोषणेनंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष पाहायला मिळाला.

मच्छिंद्र जाधव हे सामाजिक, पत्रकारिता व कामगार प्रश्नांवर दीर्घकाळापासून सक्रिय असून त्यांच्या अनुभवाचा संघटनेला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच बंडूभाऊ सोनार यांच्या संघटन कौशल्यामुळे जिल्ह्यात संघटना अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बैठकीत कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. वेतनवाढ, कंत्राटी कामगारांचे शोषण, सुरक्षा सुविधांचा अभाव, शासकीय योजनांचा अपुरा लाभ तसेच कामगारांवरील अन्याय या मुद्द्यांवर संघटना अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आगामी काळात आंदोलन, मोर्चे, निवेदने आणि कायदेशीर लढ्यांच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना, “कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून संघर्ष करणे आवश्यक आहे,” असे सांगितले.

प्रदेश अध्यक्ष (सफाई कामगार सेल) संतोष मकवाना, प्रदेश संघटक नानासाहेब बच्छाव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र जैन यांनी संघटन विस्तार, सदस्य नोंदणी मोहीम व गावपातळीवर शाखा उभारणीवर भर देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. मेजर के. एन. पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन करत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रभावी ठरला.

बैठकीत पुढील वाटचालीचा आराखडा सादर करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात संघटना मजबूत करणे, नवीन सदस्य नोंदणी वाढविणे, कामगारांसाठी हेल्पडेस्क सुरू करणे आणि तातडीच्या प्रश्नांवर तत्काळ कारवाई करणे यावर विशेष भर देण्यात आला.

या आढावा बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यात श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना अधिक बळकट झाली असून, कामगारांच्या हक्कांसाठी संघटना आणखी आक्रमक व जोमाने लढणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

Don`t copy text!