मच्छिंद्रनाथ गडाच्या पायथ्याला खोल दरीत आढळले दोन मृतदेह, घातपात की आत्महत्या चर्चेला उधाण ?     

मच्छिंद्रनाथ गडाच्या पायथ्याला खोल दरीत आढळले दोन मृतदेह, घातपात की आत्महत्या चर्चेला उधाण ?

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

मढी आणि मायंबा ही दोन्ही देवस्थान जवळपास असली तरी ती वेगवेगळ्या दोन जिल्ह्यात विखुरलेली आहेत.क्षेत्र मढी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तर मायंबा हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव हद्दीतील अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत आहे. याच मायंबाला मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट असं नाव दिलं गेलं आहे.या मच्छिंद्रनाथ गडाच्या पायथ्याशी खोल दरीत नुकतेच दोन मृतदेह आढळून आले आहेत.या दोन मृतदेहा पैकी एक मृतदेह तरुणाचा तर दुसरा मृतदेह वृद्ध व्यक्तीचा होता.तरूण व्यक्तीचा मृतदेहाचा फक्त सापळाच उरला होता तर वृद्ध व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. गडाच्या पायथ्याशी खोल दरीत काही व्यक्ती या सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांना तेथे हे मृतदेह आढळून आले.त्यांनी तातडीने गावातील ग्रामस्थांना ही माहिती दिली आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले होते. तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.सदर घटनास्थळ हे आष्टी तालुक्यातील सावरगाव शिवारात अंभोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने अंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे हे आपल्या पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. खोल दरीत अतिशय अडचणीच्या दुर्गम भागात हे मृतदेह आढळून आले असल्याने ते बाहेर काढण्या साठी पोलिसांना फार मोठी कसरत करावी लागली होती. या दोन्ही मृतदेहाच्या संदर्भात पोलिसांनी कसुन चौकशी केली असता त्यांना हे मृतदेह निलेश नारायण घोगरे (वय २६ वर्षे) राहणार बेलापूर खुर्द,तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आणि दिनकर नाना घडशिंग (वय ६५ वर्षे) राहणार भिलवडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांचे असल्याचे दिसून आले. दरम्यान मयत निलेश घोगरे हा एक महिन्या पुर्वीच गडावर दर्शनासाठी आला होता परंतु तो तेथूनच गायब झाला होता.त्याच्या नातेवाईकांनी तो हरवल्याची तक्रार अंभोरा पोलिस स्टेशनच्या दप्तरी दाखल केली होती. खोल दरीत सापडलेला मृतदेह हा निलेश घोगरे याचाच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते. निलेशचा मृतदेह पाहून त्यांच्या नातेवाईकांनी फार मोठा आक्रोश निर्माण करीत मोठ मोठ्याने हंबरडा फोडला होता.दुसरा मृतदेह हा पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथिल दिनकर नाना घडशिंग या वृद्ध व्यक्तीचा असल्याचे पोलिस तपासात दिसून आले होते.दोन्ही मृतदेह हे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. हे यात्रेकरू वाट चुकल्यामुळे अचानक खोल दरीत पडले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.तर एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळून आल्याने हा घातपात की आत्महत्या या चर्चेला परीसरात उधाण आले आहे.अंभोरा पोलिस ठाण्यात मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक देविदास सातव आणि पोलिस कॉन्स्टेबल सोपान येवले हे पुढील तपास करीत आहेत.मायंबाची यात्रा आली की आसपासच्या दुर्गम भागात असलेल्या दाट डोंगर दरीत नेहमीच मृतदेह आढळून येतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. गेल्या १८ तारखेला मौनी अमावस्येच्या दिवशी मायंबाची यात्रा भरली होती.या काळात नेहमीच हे असे प्रकार सर्रासपणे घडतात याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पोलीसांनी या कालावधीत सतर्क राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह आढळून आला ती हद्द नेमकी कोणत्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत आहे या वरून अंभोरा पोलिस स्टेशन आणि पाथर्डी पोलिस स्टेशन या दोन पोलिस स्टेशनच्या पोलीसां मध्ये नेहमीच जुगलबंदी होताना दिसुन येते.