गोराडखेडा येथे ईद मिलाद-उन-नबी निमित्त बक्षीस वितरण कार्यक्रम

गोराडखेडा येथे ईद मिलाद-उन-नबी निमित्त बक्षीस वितरण कार्यक्रम

 

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे ईद मिलाद-उन-नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली. गावाच्या परंपरेनुसार ध्वजारोहण(परचम कुशाई)करण्यात आले. या निमित्ताने, जिल्हा परिषद उर्दू शाळा, गोराडखेडा येथील विद्यार्थ्यांनी पैगंबर मुहम्मद यांच्या स्तुतीपर गीते (नात पाक) गायली आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पवित्र कुराण आणि शाळेची बॅग भेट म्हणून देण्यात आली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरत शहरातून आलेले हाजी शेख निजाम होते. हाफिज मोहसीन आणि जावेद रहीम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जावेद रहीम यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना ईद मिलादच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनातील पैलूंवर प्रकाश टाकत सांगितले की, त्यांनी शिक्षणावर किती भर दिला. बद्रच्या लढाईतील कैद्यांपैकी ज्यांनी मुलांना शिक्षण दिले,त्यांना मुक्त केले.

 

जावेद रहीम यांनी पालकांना विनंती केली की, ज्ञान हे पैगंबर मुहम्मद यांच्याकडून मिळालेला वारसा आहे. आपण सर्वांनी या निमित्ताने ही प्रतिज्ञा केली पाहिजे की आपण आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहू. मुलामुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊ. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज मोहसीन यांनी केले. हा कार्यक्रम प्रसिद्ध सुफी संत, सय्यद जलालुद्दीन बुखारी (रहमतुल्लाह ताला अलैहि) यांच्या दर्ग्याच्या आवारात आयोजित करण्यात आला होता.

 

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सय्यद मोईन, शकील सय्यद, आसिफ सय्यद, मोहसीन सय्यद, अमीन सय्यद, मुस्तफा शेख, अलीम शेख, आसिफ सय्यद, सादिक सय्यद, मुजाहिद शेख, रफीक शेख, मुख्तार सय्यद, मुबीन सय्यद, अरबाज शेख,रईस शेख, नदीम सय्यद आणि समीर शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला उपस्थित होते. फातिहा वाचन आणि दरुद व सलामवर कार्यक्रमाची सांगता झाली.