सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनसाठी जागा उपलब्ध करून द्या! आ. सत्यजीत तांबे
– अहिल्यानगर येथे जागा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाला विनंती
प्रतिनिधी,अहमदनगर
जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र बांधणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन या संस्थेसाठी कायमस्वरूपी कार्यालयाची निकड असून, ही गरज ओळखून आमदार सत्यजीत तांबे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून, शहरातील अहिल्यानगर परिसरात संस्थेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
पेन्शनर्स असोसिएशन ही जिल्ह्यातील हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर पाठबळ देणारी संस्था आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात आरोग्य, पेन्शन, विविध शासकीय योजनांचा लाभ अशा अनेक बाबतीत मार्गदर्शन करणे, सदस्यांच्या समस्या शासनदरबारी मांडणे, तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवणे असे संस्थेचे कार्य आहे. मात्र, अद्यापपर्यंत संस्थेकडे स्वतःचे कार्यालय नाही. यामुळे बैठका घेणे, कागदपत्रांचे व्यवस्थापन व सदस्यांशी संपर्क साधणे या गोष्टींमध्ये अनेक अडचणी येतात.
या पार्श्वभूमीवर आ. तांबे यांनी सामाजिक बांधिलकी जपत, शहरातील मध्यवर्ती व नागरिकांसाठी सुलभ असलेल्या अहिल्यानगर परिसरात पेन्शनर्स असोसिएशनसाठी जागा मिळावी, यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरला आहे. त्यांनी पत्राद्वारे प्रशासनाला विनंती केली आहे की, ही संस्था शासकीय सेवेतील अनुभवसंपन्न व नागरिकहितासाठी झटलेल्या व्यक्तींची असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा देणे शासनाची नैतिक जबाबदारी आहे.
सदर पत्रात आ. तांबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन संस्थेला जागा प्रदान करण्यात यावी, जेणेकरून त्यांचे कार्य अधिक व्यापक व प्रभावी स्वरूपात पुढे नेता येईल. त्यांनी प्रशासनास सुचवले आहे की, महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कोणतीही रिकामी शासकीय जागा संस्थेला वापरासाठी उपलब्ध करून देता येईल.
आमदार सत्यजीत तांबे यांच्या या पुढाकारामुळे पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, संस्थेच्या भविष्यातील विकासदृष्टीने हे पाऊल ऐतिहासिक ठरू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.