स्थानिक इतिहास तसेच बोली भाषेवर संशोधन होणे गरजेचे आहे – इतिहास संशोधक महेश सोनवणे

स्थानिक इतिहास तसेच बोली भाषेवर संशोधन होणे गरजेचे आहे
– इतिहास संशोधक महेश सोनवणे

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘जागतिक मराठी राजभाषा दिवस’ तसेच ‘कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिवसानिमित्त’ इतिहास संशोधक महेश सोनवणे यांच्या इतिहासकालीन वस्तू, वास्तू, साहित्य आणि भाषा’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच मराठीतील आद्य पद्य व गद्य ग्रंथांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठीतील ‘जाहिरात लेखन’ या विषयावर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. के.एन.सोनवणे यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. एम.टी. शिंदे यांनी करून दिला.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व इतिहास संशोधक महेश सोनवणे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, समन्वयक डॉ.एस. ए. वाघ, सेवानिवृत्त इतिहास विभाग प्रमुख प्रा.डी.बी.पाटील, एस. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना महेश सोनवणे म्हणाले की, ‘प्राचीन इतिहासकालीन वास्तू, वस्तू व साहित्याचा आजच्या भाषेची सबंध असतो. त्यामुळे स्थानिक भाषेचाही अभ्यास करून त्यावर संशोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. इतिहासकालीन वास्तू वस्तू व नाणी यांच्यावरून तत्कालीन भाषेचे स्वरूप समजते’. यावेळी त्यांनी पीपीटीद्वारे इतिहासकालीन नाणी, भाषेचे स्वरूप, इतिहासाची साधने, शिलालेख, गड, किल्ले यांची रचना, वास्तु व वस्तू यावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘मराठी भाषेला प्राचीन परंपरा असून त्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपल्या बोलीचे संवर्धन व संशोधन होणे गरजेचे आहे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एम. एल. भुसारे यांनी केले तर आभार जी.बी.बडगुजर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. बी. शिरसाठ, निवृत्ती पाटील, पुष्पा दाभाडे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर बंधू- भगिनी उपस्थित होते.