माजी सभापतींच्या मुलाचा सत्यशोधक पद्धतीने आदर्श विवाह; सोयगाव तालुक्यात चर्चेचा विषय
सोयगाव | प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथे बुधवार दि. २० मे २०२६ रोजी सत्यशोधक पद्धतीने पार पडलेला विवाह सोहळा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. चिरंजीव सचिन विष्णू ढगे आणि कुमारी वैशाली वसंत वराडे यांचा विवाह अत्यंत साधेपणाने, सामाजिक बांधिलकी जपत आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी प्रेरित होऊन संपन्न झाला.
सचिन यांच्या आई दुर्गाबाई विष्णू ढगे या सोयगाव पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या असून, वडील विष्णू ढगे हे प्रगतशील शेतकरी आहेत. तसेच सचिन यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. सामाजिक जाणीव, साधेपणा आणि परिवर्तनशील विचारांचा आदर्श या कुटुंबाने समाजासमोर ठेवला आहे.
गजानन महाराज मंदिर, शिवाजीनगर येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात कोणताही दिखाऊपणा, बँड-बाजा, डीजे, मेहंदी-मुहूर्त किंवा खर्चिक परंपरांना स्थान देण्यात आले नाही. अत्यंत साध्या पद्धतीने आणि समानतेचा संदेश देणाऱ्या सत्यशोधक विवाह पद्धतीने वधू-वरांनी आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली.
आजच्या काळात विवाह समारंभांवर होणारा अनावश्यक खर्च लक्षात घेता, या विवाहाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सोयगाव तालुक्यात अशा प्रकारचा सत्यशोधक पद्धतीने पार पडलेला हा पहिलाच विवाह असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या वेळी संजय बारी (पुणे) यांनी समाजातील तरुणांनी अशा आदर्श विवाहातून प्रेरणा घेऊन अनावश्यक खर्च टाळावा, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनी ढगे आणि वराडे परिवाराचे अभिनंदन करत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना अभिवादन करत पार पडलेला हा विवाह सोहळा सामाजिक परिवर्तनाचा नवा संदेश देणारा ठरला आहे.
























