जंजाळा किल्ल्यावर कथित बेकायदेशीर बांधकामप्रकरणी प्रशासनाकडे कारवाईची मागणी

सोयगाव : जंजाळा किल्ल्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामप्रकरणी विविध हिंदुत्ववादी व सामाजिक संघटनांनी पुरावे गोळा करून संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. संघटनांच्या प्रतिनिधींनी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून छायाचित्रे, दस्तऐवज तसेच उपलब्ध नोंदींचा अभ्यास केला असून पुरातत्व विभागाकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित बांधकामासाठी कोणती अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का, याबाबत प्रशासनाकडे स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे.
हिंदू जागरण मंचाचे हर्षल हिंदू यांनी सांगितले की, “हा विषय कोणत्याही अफवा किंवा भावनिक प्रतिक्रियांवर आधारित नाही. आम्ही प्रत्यक्ष पाहणी, पूर्वीचे पत्रव्यवहार, उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांचा अभ्यास करूनच ही भूमिका घेतली आहे. जंजाळा किल्ला हा आपल्या इतिहास आणि सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. प्रशासनाने वस्तुस्थिती तातडीने जनतेसमोर आणून बेकायदेशीरता आढळल्यास त्वरित कारवाई करावी. अन्यथा सर्व हिंदुत्ववादी व सामाजिक संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारतील.”
संघटनांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्ट केले की, ऐतिहासिक वारसा स्थळांवरील अशा प्रकारच्या कायमस्वरूपी बांधकामांना वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात अधिक अतिक्रमणांना खतपाणी मिळू शकते. त्यामुळे जंजाळा किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप जपण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी हर्षल हिंदू, सागर इंगळे, निलेश नागपुरे, जसवंतसिंह राजपूत यांच्यासह विविध हिंदुत्ववादी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : दत्तात्रय काटोले, सोयगाव

























