वालसावंगीत “सकल हिंदू समाजातर्फे भव्य जनआक्रोश मोर्चा” आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी; हजारो नागरिकांचा सहभाग

वालसावंगी | (प्रतिनिधी- महेंद्र बेराड): भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी करण्यात आले होते. गावातील मोठ्या वेशीवरील मारुती मंदिरासमोरून सकाळी सात वाजता या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित अत्याचार, ब्लॅकमेलिंग व धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा बाजार गल्ली, जुने बसस्थानक मार्गे पारध रस्ता, शिवाजी महाराज चौक, माळी समाज मंगल कार्यालय मार्गे भाजी मंडीपर्यंत शांततेत पार पडला. या मोर्चामध्ये परिसरातील हजारो नागरिक, युवक, महिला तसेच विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान “आरोपींना फाशी द्या”, “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे”, “महिलांवरील अत्याचार बंद झालेच पाहिजे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडितेला तातडीने न्याय देण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
दरम्यान, पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर गेल्या दहा वर्षांपासून अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून मुख्य संशयितासह त्याच्या कुटुंबातील आणखी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो कायद्यान्वये विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१६ पासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून मार्च २०२६ मध्ये पीडितेच्या घरात घुसून मारहाण केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी पारध पोलिसांनी चारही संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत.
मोर्चादरम्यान वालसावंगी येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एसआरपीएफच्या तुकड्यांसह पारध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण गावात छावणीसदृश वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पारध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने तसेच पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले.
निवेदन देताना पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, गावातील सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व महिला आणि बारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी आणि पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.





















