शेवगाव करांची शिवसेनेवर माया तर पाथर्डीत भाजपला अभय, मतदार संघात ओबीसीचाच डंका,मतदार संघातील सत्तेच्या सोपानावर बसलेल्या नेत्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटलेला असताना त्याचे लोण आता थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील २२२ शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातही येऊन पोहोचलो आहे.उमेदवारी मिळविण्या वरून भाजपमध्ये झालेल्या सुंदोपसुंदी चे परीणाम थेट नगर परिषद निवडणुकीतील जय पराजया मध्ये पहायला मिळाले आहे.पक्षामधील अंतर्गत गटबाजी आणि लाथाळ्याचा फटका शेवगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपलाच जास्त प्रमाणात बसला आहे.भाजप मधल्या काही लोकांनी शेवगावात अरुण मुंढे आणि पाथर्डीत अभयकाका आव्हाड यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता.अभयकाका आव्हाड आणि अरुण मुंढे हे उमेदवार पक्षाला कसे धोकादायक आहेत आणि ते निवडूनही येत नाहीत हे भाजप मधिल अंतर्गत सर्वेक्षका मार्फत काही जाणकारांनी सोईस्कर रित्या वरिष्ठांना गोपनीय अहवाल सादर करून सांगितले होते.परंतू मुंढे आणि आव्हाड यांच्या वर विखे पाटलांची मेहेर नजर असल्यामुळे ते भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धडपडत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या दोघांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवारीला भाजप अंतर्गत जोरदार विरोध होता.अरूण मुंढे यांची भाजपमधील उमेदवारी कापण्यात काहीजण यशस्वी झाले.परंतू पाथर्डीत अभयकाका आव्हाड हे विखे पाटलांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहिली.त्यांच्या उमेदवारीची दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चांगलीच दखल घेतली होती.कारण मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीची मोट बांधून सर्व ओबीसी एकत्र करावयाचे आहेत.त्याचाच हा एक भाग होता.पाथर्डीतील जागेची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर टाकण्यात आली होती.त्यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर शेवगावातील जागा आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे देण्यात आली होती.त्यांनी आपले समर्थक म्हणून फलके ताईंना उमेदवारी दिली होती.त्यामुळे शेवगावातील भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरूणभाउ मुंडे कमालीचे नाराज होऊन अतिशय अस्वस्थ झाले होते.त्यांची भाजपने कोंडी केली हे शेवटच्या क्षणी त्यांच्या लक्षात आले. परंतु पहिल्या पासूनच त्यांना हा अंदाज होता.त्यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भाजपने कापल्या मुळे त्यांनी त्यावरही मात करून शेवटचा पर्याय म्हणून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दार ठोठावले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अरुणभाउ मुंढे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सौभाग्यवती मायाताई मुंडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.अतिशय एकनिष्ठेने काम करूनही भाजपने उमेदवारी नाकारल्याने अरूणभाउ मुंडे अक्षरशः मिडिया समोर भावनिक झाले होते. येथेही पारंपारिक मराठा विरुद्ध वंजारी समाजाच्या विरोधाची झालर पहावयास मिळाली.मग त्यांनी शेवगाव तालुक्यातील सर्व मुंडे समर्थक यांची एकत्रित मोट बांधून भाजपने आपल्याला तिकीट नाकारल्याचा वचपा काढण्यासाठी प्रयत्न केले.सन २०१४ मध्ये आमदारकीच्या तिकिटावरून नाराज झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांना सोबत घेऊन थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दंड थोपटले. नगरसेवक कोणीही व्हा परंतु नगराध्यक्ष पदाचे एक मत मायावती मुंडे यांच्या धनुष्यबाण शिवसेनेलाच द्या हा नवा नारा दिला गेला.दोन्ही राष्ट्रवादीत ही उमेदवारी वरून रस्सीखेच सुरू होतीच. त्यांच्या ही अंतर्गत नाराजीचा फायदा अरुणभाऊ मुंढे यांनी घेतला.ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदाताई काकडे यांच्या जनशक्ती मंचचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीर सभेत शिवसेनेत विलीनीकरण करून घेतले. जनशक्ती मंचचे सर्व पदाधिकारी हे मायावती अरूणभाउ मुंडे यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रचारात सहभागी झाले होते.शेवगावातील सर्व पक्षांतील मत विभागाणीचा फायदा हा मायावती मुंडे यांच्या पथ्यावर पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस मधिल काही अती उत्साही आणि एसटीच्या पुढे पळणाऱ्या कार्यकर्त्यांनी शेवगावात आपलाच नगराध्यक्ष होणार असा प्रत्यक्ष भेट घेऊन निरोप दिला होता. परंतु संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अवघा एकाही नगराध्यक्ष त्यांच्या पक्षांचा निवडून आला नाही ही वस्तुस्थिती आहे. पाथर्डीत तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने आपली उमेदवारीच माघारी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलेच तोंडघशी पाडले होते. भाजप कडून अनेक वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या दिपाली बंग यांचीही या वेळी उमेदवारी कापली होती तरीही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक जिंकली.आणि भाजपला चांगली सनसनाटी चपराक दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ओबीसी एकत्र करणाला पाथर्डीत अभयकाका आव्हाड (१०७७२मते) आणि शेवगावात मायावती मुंडे(६५९१मते) यांच्या मुळे चांगलाच हातभार लागला आहे. शेवगाव-पाथर्डी तालुक्याने नगराध्यक्ष पदाच्या वंजारी समाजाच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणून जरांगेसेनेला झंझनित चपराक देत ओबीसी समाजाचे वर्चस्व प्रस्थापित करून सत्तेच्या मस्तीत राजेशाही थाटात वावरणाऱ्या पारंपारिक घराण्यांना दाखवून दिले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात ओबीसीची मोट बांधून आपलाच डी एन एन हा ओबीसीचा आहे हे पुन्हा एकदा अप्रत्यक्ष रीत्या सीद्ध केले आहे.भाजपाने पाथर्डीतील विजयाने हुरळून न जाता शेवगाव येथे झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करून आपले कोठे चुकते हे आवर्जून तपासूण पहावे.तरच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपा एकसंघ राहील.नाही तर कॉंग्रेस प्रमाणे भाजपचेही शकलं शकलं उडण्यास वेळ लागणार नाही.शेवगाव शहरामध्ये शिंदे शिवसेनेचे कोठेही नामोनिशाण नसताना त्यांच्याच पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार का निवडून येतो याचं भाजपच्या पदाधिकारीआणि नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

























