मनरेगा अंतर्गत गायगोठा अनुदानात गैरव्यवहार? — पात्र शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने संताप

मनरेगा अंतर्गत गायगोठा अनुदानात गैरव्यवहार? — पात्र शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याने संताप

 

 

 

दत्तात्रय काटोले

सोयगाव, दि. ७ (प्रतिनिधी):

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत (मनरेगा) सन २०२३-२४ मध्ये गाय-गोठा बांधकाम पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना आजपर्यंत अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात दोन लाभार्थ्यांनी — संदीप इंगळे व अशोक ढगे यांनी — जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर तसेच गटविकास अधिकारी, सोयगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

 

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, पंचायत समिती सोयगाव अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमांनुसार गोठा बांधकाम पूर्ण केले असून आवश्यक कागदपत्रांसह सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तरीदेखील या लाभार्थ्यांना अद्याप शासकीय अनुदान मिळालेले नाही. उलट, काही लाभार्थ्यांनी अपूर्ण कामे किंवा उशिरा केलेले काम दाखवून, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत आर्थिक देवाणघेवाण करून अनुदान घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

 

तक्रारदारांचे म्हणणे आहे की, “आम्ही वारंवार पंचायत समिती कार्यालयात चौकशी केली असता ‘एक-दोन दिवसात पैसे पडतील’ अशी आश्वासने दिली गेली, परंतु दिवाळी उलटूनही अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी गोठा बांधण्यासाठी उसनवारी केली असून त्यांच्यावर आर्थिक ओझे वाढले आहे.”

 

शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीत पुढील पाच मागण्या केल्या आहेत —

1️⃣ अनुदान वितरणाची सखोल चौकशी करावी.

2️⃣ गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.

3️⃣ पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वितरित करावे.

4️⃣ सन २०२१ ते २०२६ या कालावधीत दाखल सर्व प्रस्ताव व मंजुरी आदेशांच्या प्रती दोन दिवसांत उपलब्ध करून द्याव्यात.

5️⃣ प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी.

शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर ते आमरण उपोषणास बसतील. या प्रकरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला असून मनरेगा अनुदान वितरण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.