ढगफुटी सदृष्य पावसामुळे घोसला, बोरमाळ, तिडका परिसरात भीषण नुकसान – अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा शेतकऱ्यांना दिलासा दौरा
सोयगाव /दत्तात्रय काटोले
सोयगाव, ता. २१ (प्रतिनिधी) – सोयगाव तालुक्यातील घोसला, बोरमाळ, तिडका, नांदगाव, नांदगाव तांडा, निमखेडी परिसरात आलेल्या ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या प्रचंड पावसामुळे शेतातील उभं पीक वाहून गेलं असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये नदीसदृष्य स्वरूप निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी गाई-म्हशी, शेळ्या, ट्रॅक्टर अशा मालमत्तेचाही पाण्याच्या प्रवाहात अपार हानी झाली आहे.
या संकटग्रस्त भागाला मदतीचा हात देण्यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय श्री. अंबादासजी दानवे दादा यांनी दौरा केला. त्यांच्या सोबत माजी आमदार श्री. उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख श्री. राजुभाऊ राठोड, उपजिल्हाप्रमुख श्री. विठ्ठल बदर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. संजय मोटे, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. “शेतकऱ्यांनो, खचून जाऊ नका, शिवसेना पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू,” असे आश्वासन अंबादास दानवे यांनी यावेळी दिले. राजूभाऊ राठोड दिलीप मचे नानाभाऊ हिवरे व इतर सर्व पदाधिकारी हजर होते.
शिवसेनेच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, या नैसर्गिक संकटातही त्यांच्या सोबत कोणी तरी आहे, हा दिलासा मिळाला आहे.