‘शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदे करून उत्त्पन्न वाढीवर भर द्यावा’-ऍड. संदीप सुरेश पाटील
चोपडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग पीएम -उषा अंतर्गत यांच्या आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी “शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आलेले आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते दिपप्रज्वलन, प्रतिमापूजन, वृक्षपूजन, मृदापूजन तसेच वसुंधरा पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक चोपडा तहसीलचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, प्रमुख अतिथी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील, मार्गदर्शक तसेच चोपडा तालुक्याचे कृषी अधिकारी दिपक साळुंखे व धरणगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतिष कोळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, कार्यशाळा समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ आदि उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी केले.या कार्यशाळेत चोपडा तालुका पंचक्रोशीतील 200 हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक व तहसीलदार भाऊसाहेब थोरात उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे असून कृषी पर्यटनाची ओळख शेतकऱ्यांना करून दिल्यास शेतमालाची निर्यात वाढून उत्पन्न वाढीस मदत होईल’.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या पाणी व्यवस्थापन, शुद्ध पेयजल प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, सौर प्रकल्प, कचरा व्यवस्थापन तसेच महाविद्यालयाचा प्रगतीचा आढावा सादर केला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘शेतकऱ्याने टेक्नॉसेव्ही व्हायला हवे. आजच्या शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता यायला हवी त्यासाठी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे निराकरण व व्यवस्थापन करावे तसेच शेतीपूरक जोडधंदे करून उत्त्पन्न वाढीवर भर द्यावा’.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. मुकेश पाटील यांनी केले तर आभार सौ. एस. बी. पाटील यांनी मानले.
या कार्यशाळेप्रसंगी पहिल्या सत्राचे मार्गदर्शक चोपडा तालुक्याचे कृषी अधिकारी दिपक साळुंखे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘अन्न प्रक्रियेतून शेतकऱ्याचे उत्पन्न मिळेल. योजनेच्या लाभासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा.उत्तम उत्पादन व शेतीसाठी माती, पाणी व हवा यांचा समतोल राखावा.’ यावेळी त्यांनी केंद्र व राज्यशासन यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या 15 हून योजनांचे पात्रता निकष, अनुदान प्रक्रिया, पीक विमा योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.
यावेळी दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक व धरणगाव येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतिष कोळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बायोगॅस व पारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर करावा त्यामुळे जोडधंद्याला मदत मिळून आर्थिक स्थिती सुधारेल’. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या 15 हून अधिक शेतकरी हिताच्या योजनांचा परिचय करून दिला व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांचे शंका समाधान केले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्राचे मार्गदर्शक तसेच कुसुंबा महाविद्यालयातील प्रा. डॉ. सिद्धार्थ सोनवणे ‘कृषी पर्यटन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. त्याचबरोबर ग्राम व राज्यविकास साधता येतो
कृषी पर्यटनामुळे शेतीचा व ग्रामजीवनाचा परिचय होतो. स्थानिक रोजगार प्राप्ती होऊन शेतीला प्रोत्साहन मिळते.
कार्यशाळेच्या चौथ्या सत्राचे मार्गदर्शक तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील ‘कृषी सिंचनाच्या विविध पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘कृषी सिंचनाच्या पारंपारिक व आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात, कमी कार्यक्षमतेत अधिक उत्पन्न घेता येते. यावेळी त्यांनी आधुनिक व पारंपारिक सिंचन पद्धती यांचा सविस्तर परिचय करून दिला.
या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, प्रा. डॉ. सिद्धार्थ सोनवणे, प्रगतशील शेतकरी डॉ. रवींद्र निकम व ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. डी. पाटील आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या समस्या कथन केल्या व कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. रवींद्र निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सुपीक जमीन व मुबलक पाण्याची व्यवस्था करणे उत्पन्न वाढीसाठी गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापन करणे व जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला तर शेती उत्पन्न वाढून शेतकरी आत्महत्या रोखता येतील’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यशाळा समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी चोपडा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.