खडतर परिस्थितीत हार न मानता सतत प्रयत्न करत राहणं, हेच खेळ आपल्याला शिकवतात – आ. सत्यजीत तांबे यांचा हँडबॉल खेळाडूंना संदेश

खडतर परिस्थितीत हार न मानता सतत प्रयत्न करत राहणं, हेच खेळ आपल्याला शिकवतात – आ. सत्यजीत तांबे यांचा हँडबॉल खेळाडूंना संदेश

प्रतिनिधी,

कोणताही खेळ मनापासूनच खेळा. त्या खेळाच्या माध्यमातून तुमचे आणि देशाचे नाव मोठे करा, असा संदेश आमदार सत्यजीत तांबे यांनी खेळाडूंना दिला. संगमनेरच्या मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यापीठात झालेल्या ५४व्या वरिष्ठ पुरुष हँडबॉल निवड चाचणी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्हा हौशी हँडबॉल असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते झालं.

आजची तरुण पिढी केवळ एक-दोन खेळांपुरतीच मर्यादीत राहिलेली नाही. तुम्ही अनेक खेळ खेळता. मी जसा तुम्हाला प्रेरणा देत असतो, तसंच मलाही तुमच्याकडून प्रेरणा मिळते. कोणताही खेळ खेळताना तो खूप मन लावून खेळा. तसंच त्या खेळात अशी उंची गाठा की, तुमचं आणि देशाचं नाव मोठं होईल, अशी भावना आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. खेळ आणि आरोग्य यांबाबतही त्यांनी भाष्य केलं. धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. पण रोज एखादा मैदानी खेळ खेळत असाल, तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते हिताचं आहे, असं आ. तांबे म्हणाले.

निवड चाचणीदरम्यान कोणाची निवड होईल, तर कोणाला निवडलं जाणार नाही. पण सातत्य राखणं महत्त्वाचं आहे. निवड झाली नाही, म्हणून निराश होण्याचं कारण नाही. खडतर परिस्थितीत हार न मानता सतत प्रयत्न करत राहणं, हेच खेळ आपल्याला शिकवतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी खेळाडूंचे विविध प्रश्न आणि समस्या जाणून घेत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.