‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम एकमेकांच्या समन्वयातून यशस्वी करावा – जिल्हाधिकारी अमन मित्तल
जळगाव, दि. 19 : शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी एकमेकांशी समन्वय राखून पार पाडून यशस्वी करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले.
शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या 27 जून रोजी पोलीस कवायत मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विभागप्रमुखांची बैठक जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, उपवनसंरक्षक विवेक गायकवाड, सहाय्यक जिल्हाधिकरी अर्पित चौहाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध खात्याचे मंत्रीमहोदय 27 जून रोजी जळगावात येत आहेत. सर्व विभागांनी आपल्यावर सोपविलेली कामाची जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पाडावी. या कार्यक्रमास 25 हजारपेक्षा अधिक लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक ते नियोजन करावे. वाहतुक व्यवस्था, पिण्याचे पाणी, पार्कीग, आरोग्य व्यवस्था, लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, लाभार्थ्यांना लाभाचे मान्यवरांचे हस्ते वाटप याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घ्यावी.
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्ह्यातील 75 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहिती पत्रके उपलब्ध करावी. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी रोजगार मेळावा, कृषि प्रदर्शन, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.