राज्यात उद्या रात्रीपासून १ मे पर्यंत कडक लॉकडाऊन

मुंबई: करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. उद्या (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे विधान केले होते. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असला पाहिजे असे त्यांनी राज्यांना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेतं याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वच प्रमुख मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनसाठी आग्रह धरला होता.बैठकीनंतर छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड यांनी तशी विधानेही केली होती. राज्यातील करोनाची स्थिती लक्षात घेता कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे या सर्वांचेच म्हणणे होते. त्यानुसार अखेर आज निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनबाबत गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.