चोपडा महाविद्यालयात ‘राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती’ साजरी

चोपडा महाविद्यालयात ‘राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती’ साजरी

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी व इंग्रजी विभागातर्फे ‘राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी उपस्थित होते.
याप्रसंगी उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, रजिस्ट्रार श्री.डी.एम. पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉ.ए.बी.सूर्यवंशी, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तसेच भूगोल विभाग प्रमुख व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेशकुमार वाघ, इंग्रजी विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे वक्ते श्री.डी.एस.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.शैलेशकुमार वाघ मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘राजमाता जिजाऊ यांनी आपल्या सुसंस्कारी विचारातून छत्रपती शिवराय व छत्रपती शाहू महाराज यांना घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीजारोपण झाले. आजच्या पिढीने राजमाता जिजाऊ यांच्या विचारातून प्रेरणा घ्यायला हवी.’
यावेळी श्री.डी.एस.पाटील स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा परिचय करून देतांना म्हणाले की, ‘स्वामी विवेकानंद यांनी सर्व प्राणीमात्र समान आहेत. सर्व सृष्टीवर मानवता हाच महत्वपूर्ण धर्म आहे.स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा आजच्या पिढीने अवलंब करणे गरजेचे आहे.’
याप्रसंगी उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘राजमाता जिजाऊ यांनी केलेल्या सुसंस्कारामुळे स्वराज्याची पायाभरणी होण्यास मदत झाली. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञानाला पाश्चात्य देशात पोचविण्याचे अनमोल कार्य केले’.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी म्हणाले की, ‘आजच्या तरुण पिढीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता आहे. आजच्या पिढीपर्यंत या महान विभूतींचे विचार पोचविणे ही काळाची गरज आहे तरच समाज परिवर्तन होईल’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.बी. पाटील यांनी केले तर आभार डॉ.ए.बी.सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर बंधू-भगिनी उपस्थित होते.