चोपडा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

चोपडा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री.डी.डी.कर्दपवार म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक असून त्यांच्या कार्यामुळेच आज महिला सक्षमपणे प्रत्येक क्षेत्रात काम करतांना दिसत आहेत.
याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख सौ.एस.बी.पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, समाजसुधारणा विषयक कार्य महत्वपूर्ण असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज स्त्रिया शैक्षणिक क्षेत्राबरोबरच प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आज महिला भक्कमपणे प्रत्येक क्षेत्रात स्वाभिमानाने जीवन जगत आहेत कारण सामाजिक विरोध सहन करीत सावित्रीबाई फुले यांनी महिलांना दिलेल्या शिक्षणामुळेच शक्य झाले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.डी.डी.कर्दपवार यांनी केले तर आभार श्री.बी.एच.देवरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.वाय.एन.पाटील, श्री.व्ही.बी.पाटील, श्री.एस.जी.पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.