पाचोरा पुण्यभूमीला पांडवकालीन इतिहास : प्रा. सी. एन. चौधरी यांचे प्रतिपादन

पाचोरा पुण्यभूमीला पांडवकालीन इतिहास : प्रा. सी. एन. चौधरी यांचे प्रतिपादन

पाचोरा -(प्रतिनिधी)
पाचोरा पुण्यभूमी ला “पांडवकालीन महाभारताचा इतिहास असून श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कृष्णापुरी आणि पांचालीच्या शिवभक्ती च्या आराधनेला पावलेला पांचाळेश्वर महादेव हे ऐतिहासिक पुरावे आजही येथे उपलब्ध आहेत. स्वातंत्र्य काळात पाचोरा शहरात झालेला गोळीबार आणि येथील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान या सर्व घटनांचा साकल्याने विचार केला तर, पाचोरा पुण्यभूमी मध्ये जन्माला आलेले तुम्ही सर्व बालके खूप भाग्यशाली आहात” – असे प्रतिपादन एम. एम. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. सी.एन. चौधरी यांनी पाचोरा येथे व्यक्त केले. येतील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालय पाचोरा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “गाव व राष्ट्राचा इतिहास” या विषयावर आयोजित व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंडित कुमार हे होते. यावेळी प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, प्रा रवींद्र चव्हाण, पत्रकार अनिल येवले, प्रा शिवाजी शिंदे, ज्येष्ठ शिक्षक आर. के. माळी, प्रा अंकिता देशमुख, प्रतिभा पाटील, श्रीमती कल्पना पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

विद्येची देवता सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व बाबासाहेब के एस पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्येष्ठ शिक्षिका उज्वला महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना प्रा सी. एन. चौधरी यांनी पाचोरा शहराच्या इतिहासाचा बाबत सखोल मार्गदर्शन केले. पाचोरा शहराचे भौगोलिक वैशिष्ट्य, ऐतिहासिक पार्श्वभूमी, पाचोरा येथील सामाजिक, राजकीय, संगीत क्रीडा, साहित्य, कला, शेती, उद्योग- व्यवसाय, विविध धार्मिक सण -उत्सव, अध्यात्मिक परंपरा, सर्वधर्म समभाव विषयक बलस्थाने, यासोबतच स्वातंत्र्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सविस्तर कथन करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशाभिमान रुजवला.

याप्रसंगी प्रा. शिवाजी शिंदे व प्रा संगीता राजपूत यांची समयोचित भाषणे झालीत. निवृत्ती बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रा. रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रमुख वक्ते प्रा. सी.एन. चौधरी यांना गुलाब पुष्प, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी. जी. चौधरी, अंबालाल पवार, सुरेखा बडे, दीपाली दांडेकर, सुभाष जाधव, हेमराज पाटील, राकेश पाटील, आबाजी पाटील, शकील खाटीक आदींनी परिश्रम घेतले.