स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा झंडा’ उपक्रमासाठी प्रत्येक विभागाने कृति आराखडा तयार करावा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर झंडा तिरंगा’ उपक्रमासाठी
प्रत्येक विभागाने कृति आराखडा तयार करावा

-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जळगाव, दि. 8 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर झंडा’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला कृति आराखडा तयार करुन जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत हर घर झंडा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलीस अधिक्षक ग्रामीण प्रवीण मुंढे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून या गौरवाशाली पर्वानिमित्त आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. जनतेच्या मानात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने देशभरात 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात हर घर झंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन द्यावे, याकरीता जिल्हा परिषदर, महानगरपालिका, नगरपालिका यांनी आपआपल्या क्षेत्रात नागरीकांमध्ये जनजागृती करावी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबध्द कार्यक्रमांची आखणी करावी. हा उपक्रम राबविताना भारतीय ध्वज संहितेचे पालन होईल याकडेही लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात ‘हर घर झंडा’ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांनी राष्ट्रध्वज विकत घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहेत.