सावळदबारा तहानलेला; कोट्यवधींच्या योजनांनंतरही १२ ते १८ दिवसांनी पाणी मेन लाईनवरील अवैध जोडण्या, दूषित पाणीपुरवठा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची चौकशी करण्याची मागणी

सोयगाव, दत्तात्रय काटोले,
सोयगाव, दि. १३ (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने शासनाने सावळदबारा गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना आणि जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, या योजनांवर लाखो रुपये खर्च होऊनही गावातील अनेक नागरिकांना आजही १२ ते १८ दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुमारे ९९ लाख रुपये, तर जलजीवन मिशनअंतर्गत ७० लाख रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. तरीदेखील गावातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावाचा विस्तार झाल्यानंतर नव्या वस्त्यांपर्यंत अधिकृत वितरण व्यवस्था पोहोचवण्यात आलेली नाही. त्यामुळे काही नागरिकांनी थेट नळजोडण्या घेतल्याची चर्चा असून, देव्हारी-पिंपळवाडी येथून सावळदबारा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर काहींनी विनापरवाना जोडण्या घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. टाकीसाठी राखीव असलेल्या या मुख्य लाईनमधून पाणी वळवले जात असल्याने टाकीपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वितरण लाईनवरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत जोडण्या झाल्याने काही भागांना अधिक पाणी मिळते, तर गावाच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांना अनेक दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकृत नळजोडणी घेऊन नियमित नळपट्टी, घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांनाच पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. योग्य नियोजन, नियंत्रण आणि देखरेख झाली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
गावातील पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता होत नसल्याने पाण्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुद्धीकरण प्रक्रिया नियमितपणे राबवली जाते का, याबाबतही नागरिकांनी शंका उपस्थित केली असून दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
नवीन वस्त्यांपर्यंत वितरण व्यवस्था पोहोचवणे, लोकसंख्येनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आणि अवैध नळजोडण्यांवर नियंत्रण ठेवणे या बाबतीत प्रभावी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाही वारंवार परिस्थितीची माहिती देण्यात आली; मात्र अद्याप ठोस सुधारणा झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः सावळदबारा गावाची पाहणी करून मुख्य जलवाहिनीवरील जोडण्या, वितरण व्यवस्थेतील त्रुटी, पाण्याची गुणवत्ता, अवैध नळजोडण्या तसेच कोट्यवधी रुपयांच्या योजनांचा प्रत्यक्ष परिणाम यांची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शासनाचा निधी जनतेच्या हितासाठी खर्च होत असताना सावळदबारातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे स्वच्छ व नियमित पिण्याचे पाणी का मिळत नाही, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.






















