Home महाराष्ट्र प्राचीन वारसा जपण्यासाठी गलवाडा ग्रामस्थ सरसावले; मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्धार

प्राचीन वारसा जपण्यासाठी गलवाडा ग्रामस्थ सरसावले; मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्धार

प्राचीन वारसा जपण्यासाठी गलवाडा ग्रामस्थ सरसावले; मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्धार

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव, दि.४ (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. वेरूळची कैलास लेणी, अजिंठा लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग यांसारख्या जागतिक दर्जाच्या वारशासोबतच सोयगाव तालुक्यातही अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळांचा ठेवा जपला गेला आहे. याच तालुक्यातील गलवाडा हे गाव आपल्या रहस्यमय इतिहासामुळे आणि सांस्कृतिक वारशामुळे विशेष ओळख निर्माण करत आहे.

 

अजिंठा डोंगररांगांच्या परिसरात वसलेल्या या गावाजवळ श्री रुद्रेश्वर महादेव लेणी तसेच वेताळवाडी राणीचा किल्ला ही ऐतिहासिक स्थळे आहेत. गावात विविध ठिकाणी खोदकामादरम्यान प्राचीन वस्तू, मूर्ती आणि धार्मिक अवशेष सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी प्रभू शंकराची पिंड आणि नंदीची मूर्ती आढळली होती, तर त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन मूर्तीही सापडल्या. त्यामुळे गावातील ग्रामदैवत श्री मारुती मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

 

या पार्श्वभूमीवर ९ मे २०२६ रोजी गावातील नागरिकांची ऐतिहासिक बैठक पार पडली. बैठकीत ग्रामदैवत असलेल्या श्री मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गावाच्या प्राचीन वारशाला साजेसे हेमाडपंथी शैलीतील दगडी, भव्य आणि कलात्मक मंदिर उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.

 

भावी पिढीला आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा ठेवा जतन करून देण्याच्या उद्देशाने गावातील प्रत्येक कुटुंब या उपक्रमात सहभागी झाले आहे. मंदिर उभारणीसाठी अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आवश्यक निधीपैकी सुमारे ९० टक्के निधी जमा झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

 

ग्रामस्थांनी शेतकरी, व्यापारी, नोकरदार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे. प्राचीन संस्कृती आणि धार्मिक वारसा जतन करण्यासाठी अशा ग्रामदैवतांच्या मंदिरांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.

Don`t copy text!