शहाजापूर फलकेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची महंत रामगिरी महाराज येळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
जे भगवंत रूपी भक्त आहेत त्यांनाच काल्याचा प्रसाद मिळतो.असे प्रतिपादन अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहाजापूर (फलकेवाडी) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या किर्तना प्रसंगी महंत रामगिरी महाराज येळीकर यांनी केले.या प्रसंगी त्यांनी सेवेसाठी “कोणी एक भुलली नारी,विकीता गोरस घ्या म्हणे हरी”हा संत तुकाराम महाराज यांचा गौळणपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतला होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात जे चरीत्र केले त्या चरीत्राचे उच्चारण करण्याचे महाराज सांगतात.पण आचरण करण्याचे सांगत नाहीत.श्री प्रभु रामचंद्रांच्या चरीत्राचे आचरण करण्याचे सांगतात.रांगता रांगता भगवंताने गोकुळात अनेक प्रकारचे चरीत्र केले.भगवान जन्माला आल्या बरोबर चरीत्र करायला लागले.भगवान परमात्मा जन्माला आल्या बरोबर आठ वर्षांचे झाले. देवकीची तपश्चर्या महान असल्यामुळे ते लहान झाले.गोकुळात भगवंतांनी अनेक खोड्या केल्या.बालपणीच राक्षस मारून टाकले.अवघी दैत्याची खाणच संपवून टाकली.यशोदा मातेला त्या गोकुळातील गौळणी भगवंताच्या अनेक खोड्या सांगू लागल्या. भगवंताने यशोदा मातेला मुखामध्ये चौदा भुवने दाखवली.या प्रसंगी महंत रामगिरी महाराज येळीकर यांनी महीला भगीनींना उपदेश केला की आपल्या मुलांना शाळेत घाला.त्यांच्यावर चांगले संस्कार करा.गावातील तरूणांनी गोर गरीबांच्या मुलांना वह्या,पेन, शालेय साहित्य यांचे वाटप करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक शैक्षणिक कार्य करा.गावातील जिल्हा परीषद शाळेला संगणक द्या असे सांगून ते पुढे म्हणाले की जिल्हा परिषद शाळेच्या आवारात तरूणांनी धिंगाणा घालून शिक्षकांचे व मुलांचे शिक्षणा पासून लक्ष विचलित करू नये असा उपदेश केला.काला हा फक्त मृत्यू लोकातच होतो.काला हा स्वर्गात होत नाही.स्वर्गातील देवांना काल्याचा प्रसाद मिळत नाही.साधु संतांनी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात पहिला काला केला होता.श्रीकृष्ण भगवंतांनी गोपालांना गोलाकार बसविले आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या होत्या.सर्वांना कार्याचा प्रसाद दिला.तोच काल्याचा प्रसाद आज शहाजापूर (फलकेवाडी) येथील भाविक भक्तांना या प्रसंगी मिळत आहे. या सप्ताहातील शेवटची महा प्रसादाची पंगत विष्णूपंत डोईफोडे यांनी दिली.या कार्यक्रमास मृदुंगाचार्य विठ्ठल महाराज डोईफोडे,शुभम महाराज डोईफोडे, गायणाचार्य सचिन महाराज काळे,भागवत महाराज मरकड, संजय महाराज वारे, बडे भाऊसाहेब, यांच्या सह सोमेश्वर पुरुष व महिला भजनी मंडळ,समस्त ग्रामस्थ, शहाजापूर, फलकेवाडी उपस्थित होते.हा हरीनाम सप्ताह गेल्या २६ वर्षा पासून दरवर्षी संपन्न होत आहे. या सप्ताहात गावातील महिला भगिनी आणि तरुण मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेवटी उपस्थित सर्वांचे शिंदे सर यांनी आभार मानले.























