रंधा…ग्रामीण भागातील संघर्षाची कहाणी लेखक :- भाऊसाहेब मिस्तरी

रंधा…ग्रामीण भागातील संघर्षाची कहाणी
✍️ महेश लांडगे
सहाय्यक पोलीस निरीक्षक, नांदेड

रंधा
लेखक :- भाऊसाहेब मिस्तरी
प्रकाशन :- शब्दान्वय, मुंबई
किंमत :- ₹ ३२१/-
पाने :- २२१

खरं सांगायचं झालं तर मी काही समीक्षक नाही किंवा खूप मोठा लेखक. एक सामान्य वाचक. नोकरीचं रहाटगाड सांभाळून मिळालेल्या वेळेत वाचणं हा माझा छंद. बस एवढंच..

निमित्त होतं ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर आणि जागतिक पुस्तक दिन..२३ एप्रिल २०२२. माझे फेसबुक मित्र डॉ.श्री.भाऊसाहेब मिस्तरी यांची “रंधा” ही कादंबरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीदिनी प्रकाशित करण्यात आली. सदरची पोस्ट त्यांनी फेसबुक या समाज माध्यमावर प्रसारित केली होती आणि “रंधा” हे पुस्तक उदगीर येथे उपलब्ध असल्याबाबत कळवले होते. त्यानुसार मी स्टॉल क्रमांक ११७ येथून “रंधा” घेतली आणि दोन दिवसात ती पूर्ण केली.

*”रंधा” बाबत…*
पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं की ते आपल्याला एका अवर्तनात घेऊन जातं. इतके ते सुंदर बनवले आहे. मला एक सवय आहे, मी पुस्तक घेतलं किंवा पाहताना पण अगोदर मुखपृष्ठ पाहतो आणि लगेच मलपृष्ठ. याबाबतीतही तेच. मलापृष्ठावरील उद्धृत केलेला उतारा वाचला की वाचकाच्या मनात पुढं काय झालं असेल याची उत्सुकता ताणली जाते तशीच माझी ही उत्सुकता ताणली गेली. आणि कादंबरी वाचायला सुरुवात झाली.

“सकाळचं कोवळं ऊन आता चांगलं तापायला लागलं होतं…या ग्रामीण भागातील वर्णनाने आणि भाषेने कादंबरीची सुरुवात होते. ग्रामीण भागातील घर, पसारा, होळी चौक, गल्लीतील वर्णने, सुताराच्या घरासमोरील अंगणात पडलेली साधने, औजारे, त्यासाठी जमलेले शेतकरी यांचे हुबेहूब वर्णन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आपला बाप आहे म्हणून त्याचे कुठेही खोटे वर्णन वाचताना आढळत नाही. लेखकाचे वडील हे संशयी व कडक स्वभावाचे आहेत आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला इतकं स्पष्ट वर्णन केले आहे.

भविष्य पाहणाऱ्या वर विश्वास न ठेवणारा बाप वाल्मीक मात्र कमालीचा त्याच्या हातावर आणि घामावर विश्वास ठेवतो परंतु सुतारकाम करण्यासाठी आलेला त्याचा मित्र त्याला भविष्य पाहायला मजबूर करतो आणि भविष्य सांगणारा पोपट मात्र विश्वास न बसणारं भविष्य सांगतो…”ह्या माणसाच्या भाग्यात तीन बायका आहेत..” वगैरे.. नुकतेच त्याचे दुसरे लग्न होऊन एक मूल अजूनही पाळण्यात आहे आणि हे अजब असे भविष्य…पण नियतीचा फेरा आणि कावळ्याची फांदी तुटायला एकच वेळ येते आणि दुसऱ्या बायकोचा आणि त्या लहान बाळाच्या करुण अंत होतो. तोच मलापृष्ठवरील उतारा..वाचकाच्या मनाचा हळुवार ताबा घेते आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या शिवाय राहत नाहीत. लेखकाची आई म्हणजेच वाल्मिक अण्णाची तिसरी पत्नी कुसुम जिला लेखक ताई म्हणतो. वाल्मिक लेखकांचे वडील ते त्यांना अण्णा म्हणतात. अण्णाची आधीची दोन मुले सांभाळण्यासाठी कुसुमचे वडील नोकरदार मुलांची आलेली स्थळे नाकारून तिचा हात अण्णाच्या हातात घालतात कारण काय तर कुसुमच्या बापाने आईविना होणारी हेळसांड अनुभवली आहे. तशी हेळसांड या दोन निरागस जीवांची होऊ नये म्हणून. वाचताना जाणवत राहतं की आता अशी माणसं खरंच या दुनियेत आहेत का?

लेखक, त्याचे अण्णा (वडील), ताई आणि भाऊ यांच्यावर आलेल्या वेगवेगळ्या संघर्षाची कहाणी पदोपदी जाणवत राहते. त्यातूनही मार्ग काढत, पारंपरिक व्यवसाय, चालीरीती, परंपरा जपल्या जातात आणि वेळ आल्यावर काही परंपरा मोडल्या जातात. इतकं स्पष्टपणे लेखकाने मांडले आहे. शाळेत जाण्याची लेखकाची ओढ तर थक्क करणारी आहे. गुरूजी त्याला कान धरायला सांगतात आणि हा चक्क गुरुजींचे कान धरायला निघतो… मग गुरूजी ओळखून तुझे स्वतःचे कान धर म्हणतात आणि तो स्वतःचे कान धरायचा प्रयत्न करतो पण कान काही हातात येत नाही आणि वाचक सुद्धा नकळत स्वतःचे कान धरायचा प्रयत्न करतो. गणवेश घालून आल्याशिवाय शाळेत यायचे नाही म्हणून भाऊ आठ दिवस शाळेत जात नाही. बकरी किंवा चिमणी याविषयी लेखकाचे असलेले प्रेम नजरेत भरण्यासारखे आहे.

गावात येणारी विविध व्यक्तिमत्वे जसे गारेगारवाला समीर भाई..नेहमीच भाऊला गोळा देणारा..तर भिका कल्हईवाला..याची तर अख्खा गाव वाट पहायचं.. बिड्या फुकून फुंकून म्हातारा होऊन आर्वी गावातील विहिरीत पडून मेला त्यादिवशी गावकऱ्यांनी त्याची अंत्ययात्रा काढली..अवघी गावातील मायमाऊली रडली. ज्या भिकाला कोणीही नातेवाईक नव्हते त्यासाठी..यावेळी सुद्धा वाचकाला भिकाबद्दल हळहळ वाटते.

भाऊचा आठवा नंबर.. सर्वात मोठा दादा हा शेतकी करून नोकरीला लागतो. मग त्याचे लग्न, लग्नातील गमतीजमती, दादा वहिनीला सोबत घेऊन जायचे ठरवतो, वहिनीचे ताई सोबत कळशी साठी भांडण, बसमधील प्रसंग, चंदूची अभ्यासातील हुशारी, बोर्डात आलेला पहिला क्रमांक, अण्णा व ताईच्या कष्टाचे केलेले चीज, भाऊचा ट्रॅक्टर मध्ये बसून जाताना झालेला अपघात, अक्षय तृतीया याला खानदेशात “आखाजी” म्हणतात त्याची वर्णने, त्यावेळी म्हणली जाणारी लोकगीते ही लेखकाने उद्धृत केली आहेत. त्यात कुठेही लेखकाने स्वतःचा बडेजाव केलेला दिसून येत नाही. अत्यंत स्पष्ट व रोखठोक लिहिले आहे. बालपणातील निरागसपणा कुठेही कमी झाल्याचे दिसून येत नाही. लहानपणी केलेले संस्कार आयुष्यभरासाठी बालमनावर कोरले जातात ते सहजपणे वाचताना जाणवत राहते.

अण्णा आणि ताईचा हा चाललेला सगळा आटापिटा फक्त आणि फक्त आपल्या लेकरांसाठी आहे हे शेवटपर्यंत जाणवत राहतं. अगदी कादंबरीच्या शेवटी सुद्धा चंदुच्या सहलीसाठी अण्णा आणि ताई दोन वेळा बाजरी विकून पैसे देतात…जरी उद्याच्या जेवणाची भ्रांत असली तरी…कारण त्यांचा प्रयत्नावर आणि स्वतः च्या कष्टावर प्रचंड विश्वास आहे. कारण लाकडावर जेवढा “रंधा” फिरवला जाईल तेवढे ते मऊ आणि चकचकीत होतं.. तसच काहीसं अण्णाचं आणि ताईचं झालं होतं पण “रंधा” मारायचं काम अखंड सुरू होतं.
संघर्ष, चालीरीती, परंपरा, निसर्ग यासह ही कादंबरी कौटुंबिक, सामाजिक स्तरावर विविध प्रसंगातून वाचकांच्या मनात घर करून जाते. वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैलीतून कादंबरी आकाराला आली आहे. प्रत्येकाने ही कादंबरी जरूर वाचायला हवी अशी झाली आहे.

बाकी पुस्तक सुद्धा नावाप्रमाणेच *”रंधा”* मारल्यासारखे झाले आहे, यात तिळमात्र शंका नाही.
चूकभूल माफी असावी.
धन्यवाद!

कादंबरीसाठी संपर्क नंबर :
9321773163
Prabhakar Pawar