जालन्याच्या लेकींचा महाराष्ट्रात डंका; इयत्ता १२वीत घवघवीत यश
पारध/महेंद्र बेराड : जालना जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी येथील दोन विद्यार्थिनींनी इयत्ता १२ वीच्या परीक्षेत करून दाखवली आहे. आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या विद्यार्थिनींनी संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
भोकरदन तालुक्यातील वरूड बु.येथील शारदा विद्या मंदिर या शाळेची विद्यार्थिनी कु. जयश्री देविदास पाटील हिने मराठी विषयात तब्बल ९९ गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
तसेच जालना येथील श्रीमती दानकुंवर हिंदी कनिष्ठ महाविद्यालय ची विद्यार्थिनी कु. विशाखा विलास पाटील हिने मराठी विषयात ९८ गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे जालना जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामागे पालक, शिक्षक व शाळेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींवर परिसरातील शिक्षक,पालक आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करत राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

























