लहान वय, मोठी कला; पाचोऱ्याच्या विधान वाघ-लक्ष्मी वाघ यांची चित्रे ‘शिक्षक ध्येय’मध्ये प्रकाशित
पाचोरा : वयाच्या अगदी कोवळ्या टप्प्यातच आपल्या कल्पनाशक्तीच्या रंगांनी कागद सजवणारे विधान कोमल वाघ (वय ४ वर्षे) आणि लक्ष्मी कोमल वाघ (वय ५ वर्षे) हे चिमुकले कलाकार सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कोणताही चित्रकलेचा क्लास न लावता, केवळ स्वतःच्या कल्पनेतून त्यांनी साकारलेली चित्रे पाहणाऱ्यांना थक्क करणारी आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये निरागसता, रंगांची सुरेख उधळण आणि वेगळी कल्पकता दिसून येते.
या चिमुकल्या कलेची दखल ‘शिक्षक ध्येय’ या साप्ताहिकाने घेत त्यांच्या चित्रांचे प्रकाशन केले आहे. इतक्या लहान वयात मिळालेली ही संधी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठी पायरी ठरत आहे.
विधान वाघ आणि लक्ष्मी लक्ष्मी हे सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथील विद्यार्थी असून शाळेतही त्यांच्या कलेचे विशेष कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, त्यांची आई प्रा. सौ. जयश्रीताई वाघ या स्वतः फाईन आर्ट्समध्ये टॉपर असून, वडील श्री. कोमल वाघ यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. कलेची ही परंपरा आणि घरातून मिळणारे प्रोत्साहन यामुळेच या चिमुकल्या कलाकारांची झेप अधिक उंचावत आहे.
या दोन्ही बालकलाकारांनी पुढे जाऊन मोठ्या उंची गाठाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























