किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

जळगाव, दि. 15 – जिल्ह्यात पिक उगवण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल झालेली नसल्याने किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
किमान ८० ते १०० मिमि पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पिक तग धरु शकते. मात्र जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतू पाऊस सर्वदूर सारख्या प्रमाणात पडत नसून तुरळक स्वरुपात पडत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयोग्य चांगला पाऊस झालेला नाही. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिमि पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असेही श्री. ठाकूर यांनी कळविले आहे.