Home महाराष्ट्र ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या पोलीस पाल्यांचा गौरव

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या पोलीस पाल्यांचा गौरव

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या पोलीस पाल्यांचा गौरव

 

 

 

सोयगाव प्रतिनिधी, दत्तात्रय काटोले छत्रपती संभाजीनगर, दि. ६ जून – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा विशेष सत्कार सोहळा शनिवारी पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे उत्साहात पार पडला.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी पोलीस अधीक्षक जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेतले. “मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. तुमच्या उच्च शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले. यशासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व चिकाटी आवश्यक असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत या यशातून इतर पोलीस पाल्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना एका गुणवंत विद्यार्थ्याने आपल्या पोलीस वडिलांच्या त्यागाचा उल्लेख करत हा सन्मान भविष्यात आणखी मोठे यश मिळविण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.

सन्मानित गुणवंत विद्यार्थी

इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुष्का दत्तात्रय सुयवंशी (९५.४०%), सारिका योगेश तरमाळे (९४.८०%), ओमकार दत्तात्रय सुयवंशी (९४.७६%), हर्षल सुनिल पवार (९४.००%), देवेन विनोद पदमणे (९३.२०%), सिद्धांत सुनिल ठोंबरे (९३.००%), आकांक्षा महेश घुगे (९२.०६%), तनुजा शिवाजी मुदेवाड (९१.६०%) आणि रुषी भानुदास चव्हाण (९१.६०%) यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांच्या मनोबलात वाढ करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Don`t copy text!