अवैध गौण खनिज वाहतुकीवर ग्रामीण पोलिसांचा धडक प्रहार; 76.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, दि. 4 जून – जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 07 वाहनांसह एकूण 76 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू व मुरूम माफियांमध्ये खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात विशेष गस्त मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 3 जून रोजी जिल्हा गस्तीदरम्यान विविध भागांत धाडी टाकून बेकायदेशीररीत्या वाळू व मुरूम उत्खनन करून त्याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या 07 वाहनांवर कारवाई करण्यात आली.
ग्रामीण पोलिसांच्या विविध पथकांनी गंगापूर, शिल्लेगाव, विरगाव, एमआयडीसी पैठण, अजिंठा, पिशोर आणि करमाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबवली. यावेळी शासनाचा महसूल बुडवून छुप्या मार्गाने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान एकूण 15 ब्रास वाळू व 4 ब्रास मुरूम, असा 19 ब्रास गौण खनिज साठा जप्त करण्यात आला. जप्त खनिजाची अंदाजे किंमत 91 हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 5 हायवा ट्रक आणि 2 ट्रॅक्टरही ताब्यात घेण्यात आले. जप्त वाहनांची अंदाजे किंमत 76 लाख रुपये आहे.
जप्त करण्यात आलेली सर्व वाहने संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आली असून, संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच गौण खनिज कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, जप्त वाहनांचे परवाने रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाळू उपसा, चोरटी वाहतूक, मुरूमाची अवैध वाहतूक किंवा इतर अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिला आहे. पर्यावरणाची हानी व शासकीय महसूलाचे नुकसान करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात यापुढेही संपूर्ण जिल्ह्यात अशाच प्रकारच्या धडक आणि सरप्राईज कारवाया सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

























