दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी विकास प्रकल्प विभाग यावल यांच्यात सामंजस्य करार
(आदिवासी विभागातील योजना विद्यार्थ्यामार्फत आदिवासी खेड्यापाड्यांपर्यंत पोचणार: आदिवासी विद्यार्थी बनणार माहिती व समाजदूत)
चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय आणि आदिवासी विकास प्रकल्प विभाग यावल यांच्यात नुकताच (दि. ६ मे २०२६ रोजी) एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या करारांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील लोकांसाठीच्या विविध प्रशासकीय व शासकीय योजना आदिवासी जनसमुदायापर्यंत पोहोचविण्यास हातभार लाभणार आहे.
महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी भागातील असल्याने त्यांना स्थानिक समस्यांची , आर्थिक व सामाजिक स्थितीची जाणीव असते. सदर बाबी लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आदिवासी विकास प्रकल्प विभाग कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या आदिवासी भागातील लोकांसाठीच्या योजनांची माहिती थेट आदिवासी दुर्गम भागातील खेड्यापाड्यात पोहोचविण्याचे उद्दिष्ट या करारामागे आहे. तसेच, या सामंजस्य करारांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास प्रकल्प विभाग कार्यालयातील विविध अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार असून प्रत्यक्ष आदिवासी विकास प्रकल्प विभागातील राबविल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आदिवासी विकास प्रकल्प विभागातील प्रशासकीय कामकाजाची जवळून ओळख होईल.
या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे आणि यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. संदीप पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच सचिव डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील यांनी प्राचार्या आणि संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.
या करार कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ. शैलेश वाघ, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. पटले, डॉ. एम.एल.भुसारे व पी.आर.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
















