पाचोरा शहरातील महिला बचत गटांचा नवी दिल्ली येथे गौरव

पाचोरा : केंद्र सरकारच्या अमृत योजना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “वूमन फॉर ट्रीज” उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांचा गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे दि. १३ मार्च रोजी “अमृत मित्र महोत्सव” हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर होते. यावेळी शहरी विकास खात्याचे सचिव, सहसचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमास देशातील सुमारे ३० राज्यांमधील महिला बचत गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, एका नगरपरिषदेचे सर्वाधिक प्रतिनिधित्व पाचोरा शहराने केले असून पाचोरा येथील तब्बल ८० महिला बचत गट प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमातील अमृत योजनेवरील चर्चासत्रात पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना अनुभव मांडण्याची संधी देण्यात आली. त्यांनी पाचोरा शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. शहरातील मोकळ्या जागा व्यवस्थित उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नगरपालिकेच्या विविध कामांमध्ये महिला बचत गटांचा अधिक सहभाग वाढविण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमामुळे पाचोरा शहरातील महिला बचत गटांचा उत्साह वाढणार असून येत्या काळात त्या अधिक जोमाने विविध विकासकामांमध्ये सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह जिल्हा सहआयुक्त जनार्दन पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक दगडू मराठे, शहर अभियान व्यवस्थापक अर्जुन भोळे, पाणीपुरवठा अभियंता श्रुतिका धात्रक, भंडारपाल प्रगती खडसे तसेच समूह संघटक कुणाल तायडे उपस्थित होते.
























