चोपडा महाविद्यालयात भूगोल अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा येथील पदव्युत्तर व संशोधन भूगोलशास्त्र विभाग यांच्यातर्फे तृतीय वर्ष कला भूगोल विषयाच्या एकदिवसीय अभ्यासक्रम (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020) पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळा आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ.स्मिताताई संदीप पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यशाळेच्या उदघाटन समारोहप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत यांच्या हस्ते वसुंधरा व वृक्षपूजन करून तसेच माजी शिक्षणमंत्री कै.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थापक अध्यक्ष कै.मा.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यशाळेप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. डी. ए. सूर्यवंशी, भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश शेलार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माजी प्राचार्य डॉ. एस. एस. अलिझाड तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.सूर्यवंशी, कार्यशाळा तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.शैलेशकुमार वाघ, अभ्यास मंडळ सदस्य विद्यार्थी प्रतिनिधी मयुरी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे समन्वयक व भूगोल विभाग प्रमुख डॉ.शैलेशकुमार वाघ केले. त्यातून त्यांनी तृतीय वर्ष भूगोल विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
सदर कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील एकूण 100 हून अधिक प्राध्यापक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना भावी जीवनात मार्गदर्शक ठरेल असा तृतीय वर्ष कला भूगोल विषयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात आला. सदर कार्यशाळेत पाचव्या सत्रातील 07 पेपर व सहाव्या सत्रातील 07 पेपरचा अभ्यासक्रम गठीत करण्यात आला. सदर कार्यशाळेत अभ्यासक्रमांसंदर्भात सखोल चर्चा झाली. सहभागी प्रतिनिधींनी अभ्यासक्रम पेपरचे सादरीकरण करून त्यावर आपले मत व्यक्त केले.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील मनोगतात म्हणाले की, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकाचा उपयोग केल्यास अध्ययन व अध्यापनात सुलभता निर्माण होईल.अभ्यासक्रम रचना प्रक्रियेत अध्यापकांनी सहभाग घ्यावा व विद्यार्थ्यांना अध्ययन सुकर होण्यास मदत होईल अशा अभ्यासक्रमाची रचना करावी.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. एस. एस. अलिझाड मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘नवीन येणाऱ्या शैक्षणिक प्रणालीस सामोरे जाऊन विद्यार्थी हित जोपसणाऱ्या अभ्यासक्रमांची रचना करणे आवश्यक आहे, तरच विद्यार्थी स्पर्धेत टिकेल’.
यावेळी माजी अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आंतर विद्याशाखीय घटकांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावतील. विषयाची व्याप्ती वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध शाखांशी सामंजस्य करार करायला हवेत’.
यावेळी कार्यशाळेचे उदघाटक तसेच विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.एस.एस.राजपूत उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘अभ्यासक्रम हा रोजगारक्षम, विषयांचे सखोल ज्ञान देणारा असावा.भूगोल विषय सर्वसमावेशक असून पर्यावरण जडणघडणीत या विषयाचा महत्वाचा वाटा आहे. या विषयात मोठ्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांना त्याची ओळख करून देणे गरजेचे आहे.’
याप्रसंगी कार्यशाळेचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘अभ्यासक्रम ठरवितांना स्पर्धा परीक्षेचे घटक अभ्यासक्रमात समाविष्ट करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल व विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहिल यात शंका नाही’.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कार्यशाळेचे सह-समन्वयक डॉ.मुकेश बी.पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सौ.संगीता पाटील यांनी मानले.
या कार्यशाळेच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील, भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश शेलार, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, कार्यशाळा समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.सदाशिव सूर्यवंशी, डॉ. सिद्धार्थ सोनवणे, डॉ. अनिल हिवाळे यांनी मनोगत व्यक्त करून उत्कृष्ट कार्यशाळा आयोजनासंदर्भात समाधान व्यक्त केले.
यावेळी भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुरेश शेलार यांनी विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम सुटसुटीत, अध्ययन सुलभ व विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक ज्ञान देणारा असावा असे मत व्यक्त केले.
या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक शैलेशकुमार वाघ यांनी केले तर आभार डॉ. मुकेश बी. पाटील यांनी मानले.
सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व आयोजन व संयोजन समिती प्रमुख, सदस्य तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेप्रसंगी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतिनिधी तसेच महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते.

















