गुणवत्ता वाढीसाठी व यशासाठी ध्येय ठरवून वाटचाल करावी – संदीप पाटील

गुणवत्ता वाढीसाठी व यशासाठी ध्येय ठरवून वाटचाल करावी – संदीप पाटील

 

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि संकल्प एज्युकेशन पालघर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा विविध शिष्यवृत्ती योजना मार्गदर्शन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मराठा सेवा समितीचे विभागीय अध्यक्ष रामदादा पवार यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक तसेच मराठा सेवा समितीचे विभागीय अध्यक्ष रामदादा पवार, प्रमुख मार्गदर्शक व प्रकल्प संचालक जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था महाराष्ट्र तसेच जळगाव येथील स्वयंदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव संदीप पाटील, प्रमुख अतिथी व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील, चोपडा येथील स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक ऍड. उमेश मराठे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ. आर.आर. पाटील आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचा विकास व हित साधण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद केले.

उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना मराठा सेवा समितीचे विभागीय अध्यक्ष रामदादा पवार म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या संधीचा फायदा घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा फायदा घेऊन स्वयंविकास साधावा.

कार्यशाळेचे मार्गदर्शक व वक्ते संदीप पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘खानदेशातील विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रशासकीय व्यवस्थेत जाण्यासाठी प्रयत्नशील राहावे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी ध्येय ठरवून वाटचाल केल्यास त्यांना नक्कीच यश मिळेल. त्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेद्वारे आवश्यक ती मदत विद्यार्थ्यांना करण्यात येईल. आपल्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. त्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे विविध कार्यशाळांच्या आयोजन करण्यात येईल. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा,असेही त्यांनी आवाहन केले.

या कार्यशाळेप्रसंगी ऍड. उमेश मराठे यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली. एसटी प्रवर्ग तसेच इतर मागासवर्गीय जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील व विविध शासकीय योजनांसाठीच्या कागदपत्राची माहिती देऊन आवश्यक फॉर्म भरून घेतले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, ‘शासकीय योजनांचा तसेच उपलब्ध संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास व अभ्यासातील सातत्य ठेवणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अनुकूल वातावरणाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घ्यावा’.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनीता बी.पाटील यांनी केले तर आभार डॉ. आर. आर.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सदस्यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.