जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागा,आमदार राजळेंचे कार्यकर्त्यांना आदेश
(सुनिल नजन अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) आगामी काळात होउ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीच्या कामाला लागा, शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था या कोणत्याही परीस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्या पाहिजेत असे आदेशच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी कार्यकर्त्यांना दिले.त्या शेवगाव तालुक्यातील आखदवाडे येथिल विविध विकास कामांच्या शुभारंभा प्रसंगी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव भिसे तर प्रमुख पाहुणे म्हणून लोळेगाव येथील बिरोबाभक्त बाबाजी महाराज बनसुडे हे होते. या वेळी भाजपाचे माजी शेवगाव तालुका अध्यक्ष बापुसाहेब पाटेकर हे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते. शेवगाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सर्व गट आणि गण, नगर पालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आल्या पाहिजेत या साठी मतदार संघातील सर्वच कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागले पाहिजे.केंद्रात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्षाचेच सरकार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पालिकेमध्ये ही भाजपाचीच एकमुखी सत्ता स्थापन झाली तर मतदार संघातील विविध विकास कामांचा वेग वाढेल.कार्यकर्ते सक्षम झाले पाहिजे अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.आखदवाडे शिवारातील रामगड मंदिरात आपेगाव आणि ढोरजळगाव, भातकुडगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.समोरचा उमेदवार कोणीही असो पण आपण जिंकण्याची जिद्द आणि चिकाटी ठेवली पाहिजे.सर्वांनी हेवेदावे विसरून एकजुटीने काम केले तर विजय मिळविणे सोपे आहे. कोणत्याही परीस्थितीत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकवला पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुका या निवडणुकीत सुधारल्या पाहिजे असे आमदार राजळे यांनी सर्वांना निक्षून सांगितले.पक्ष देईल तो उमेदवार सर्वांनी स्विकारला पाहिजे.राज्य पातळीवर जो निर्णय होईल तो सर्वांनीच मान्य करून मोठ्या जोमाने काम सुरू केले तरच आपण यशस्वी रीतीने पुढे जाऊन चांगले काम करू असे त्यांनी सांगितले.यावेळी विविध गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष,सदस्य उपस्थित होते.