धुळ्यातील शिक्षकांचे रखडलेले वेतन लवकरच जमा होणार- आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश
– वेतन अधीक्षक नियुक्त करण्याची केली होती मागणी
प्रतिनिधी,
धुळे जिल्ह्याच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून प्राथमिक व माध्यमिक विभागांमध्ये वेतन अधीक्षक नसल्यामुळे शिक्षकांचे वेतन रखडले होते. परिणामी, जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण आयुक्त आणि नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याशी वारंवार पाठपुरावा केला. धुळे जिल्ह्यासाठी माध्यमिक आणि प्राथमिक विभागासाठी वेतन अधीक्षक नियुक्त करण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, अखेर धुळे जिल्ह्यासाठी माध्यमिक विभागासाठी रियाज तडवी आणि प्राथमिक विभागासाठी प्रमोद सोनार यांच्याकडे प्रभारी वेतन अधीक्षक पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे.
प्रभारी वेतन अधीक्षक पदाचा तात्पुरता चार्ज मिळाल्याने आता रखडलेले वेतन लवकरच शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी केवळ तात्पुरती व्यवस्था करून न थांबता, कायमस्वरूपी वेतन अधीक्षक पदाची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. वेतन रखडल्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे तातडीने प्रभारी वेतन अधीक्षकांची नियुक्ती करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. तसेच, कायमस्वरूपी वेतन अधीक्षकांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.