पाचोरा व भडगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ घोषित करण्याची- अमोल शिंदे यांची मागणी

पाचोरा व भडगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ घोषित करण्याची- अमोल शिंदे यांची मागणी

———————————————————–
ना.गिरीष महाजन यांची भेट घेऊन पाचोरा व भडगावातील शेतकऱ्यांच्या वतीने दिले निवेदन. —————————————————-

पाचोरा-

राज्य शासनाच्या महसूल विभागाने महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा शासन निर्णय काल दि.३१ ऑक्टोबर रोजी निर्गमित केला असून लवकरच उर्वरित तालुक्यामध्ये महसूल व कृषि विभाग मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून राज्यभरातील तालुक्यांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होणार असल्याने या मध्ये पाचोरा व भडगाव तालुक्याचा समावेश करण्याबाबतचे निवेदन भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी मुंबई येथे ना.गिरीष महाजन यांना पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने दिले आहे.
आपल्या निवेदनात अमोल शिंदे यांनी म्हटले आहे की,जळगाव जिल्ह्यात या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलेला असून त्यामुळे खरीप हंगामातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या पाळीव जनावरांकरिता चारा उपलब्ध होणे देखील कठीण झालेले आहे. याबाबत कृषी विभागातील मागील पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाचे आकडे पाहिले असता यावर्षी ८० टक्के पेक्षा जास्त उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झालेली असून सर्व बागायती व कोरडवाहू शेतकरी यांना मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.तसेच या वर्षी पाचोरा व भडगाव तालुक्यात ३० दिवसा पेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने शेती पिके पुर्णपणे नुकसानग्रस्त झालेली आहेत.

वरील नमुद सर्व घटकाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती अमोल शिंदे यांनी यावेळी केली आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यास मिळणार या सवलती…
१) जमीन महसुलात सूट
२)पीक कर्जाचे पुनर्गठन
३)शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
४)कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5% सूट
५) शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शितलता
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर
८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचे तोडणी खंडित न करणे

यासोबतच सर्वच शेतकऱ्यांना पीकविमा व राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात प्राधान्य मिळणार आहे.