मुख्य कार्यकारी अधिकारी व शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी निवासी कार्यशाळेचे आयोजन

मुख्य कार्यकारी अधिकारी व शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी निवासी कार्यशाळेचे आयोजन

जळगाव, दिनांक 27  : शालेय शिक्षण विभागाच्यावतीने स्टार व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणावळा येथील द अँम्बी व्हॅली सिटी येथे 28 व 29 एप्रिल, 2023 दरम्यान या निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अध्यक्षस्थानी असतील. कार्यशाळेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच राज्याच्या मनपाचे आयुक्त, जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक, योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक, बालभारतीचे संचालक, सर्व विभागांचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासह राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, मनपा व नगरपरिषदेचे शिक्षण प्रमुख, प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयातील अधिकारी आदी या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
कोव्हिड कालावधीत राज्यातील मुलांच्या शिक्षणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सांघिकपणे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने यंदाचे वर्ष गुणवत्ता वृद्धी वर्ष म्हणून घोषित केले आहे. तसेच केंद्र शासनाने निपुण भारत अभियान व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविणे बाबत वारंवार सूचित केले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रशासकीय व शैक्षणिक बाबींचे नियोजन सनियंत्रण करणे यासाठी या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे स्वागत व प्रास्ताविक करतील. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल शैक्षणिक धोरणाबाबतचा प्रवास व राज्याची भविष्यवेधी दृष्टी या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. तदनंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थितांशी संवाद साधतील. उद्घाटन सत्राचा समारोप महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे करतील.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रांत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचां आढावा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे व डॉ. नेहा बेलसरे या घेतील. तद्नंतर प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापनाचे शास्त्र या विषयावर क्वेस्ट या सामाजिक संस्थेचे निलेश निमकर उपस्थितांशी संवाद साधतील. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलास पगारे निपुण भारत या विषयावर सादरीकरण करतील. दुपारच्या सत्रात यवतमाळ, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील उत्तम शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण होईल. तद्नंतर मुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र स्टार प्रकल्प, समग्र शिक्षेशी संबधित प्रकल्प, पीएमश्री शाळा या विषयावरील सादरीकरणाने होईल. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे हे या विषयावर सादरीकरण करतील. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण व भाषा, गणिताची स्थिती या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. योजना शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर नवभारत साक्षरता अभियान या विषयावर सादरीकरण करतील. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील हे तद्नंतर बालभारतीशी संबधित विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने शाळा समूह या विषयावर सादरीकरण होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका या विषयावर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे उपस्थितांशी संवाद साधतील. दुपारच्या सत्रात आदर्श शाळांची सद्यस्थिती यावर चर्चा होईल. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्या समारोपपर मार्गदर्शनाने कार्यशाळेची सांगता होईल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी हे आभार प्रदर्शन करतील. असे डॉ. नेहा बेलसरे, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.