संचार माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नका- सहाय्यक अधीक्षक कृषिकेश रावळे

संचार माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नका- सहाय्यक अधीक्षक कृषिकेश रावळे

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे ‘सायबर सेक्युरिटी: शक्यता आणि खबरदारी’ या विषयावर आधारित ‘एकदिवसीय कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन दीपप्रज्वलनाने करून करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक, चोपडा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कृषिकेश रावले, (IPS) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी व उपप्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.ए.एल.चौधरी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
या कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाच्या विविध विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची माहिती दिली तसेच आजच्या काळात आवश्यक असलेले सायबर साक्षरतेचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी श्री. कृषिकेश रावले यांनी ‘सायबर सेक्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शन करतांना समाज माध्यमे, ऑनलाइन बँकिंग व एकूणच सायबर जगतात घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती, व्याप्ती व कार्यपद्धती विद्यार्थ्यांना उलगडून सांगितली. ‘प्रलोभनामुळे तरुणाई किंवा सामान्य नागरिक अनेक ऑनलाइन स्कॅम्सला बळी पडतात. यामध्ये फोनद्वारे तोतया व्यक्तींना OTP शेअर करणे किंवा त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणे अशा चुकांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होते’ असेही ते म्हणाले. सायबर गुन्ह्याचे बळी ठरल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन वर कॉल करावा तसेच ‘सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत ‘सायबर हिरो’ म्हणून काम केले तर समाजातील सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल व सायबर गुन्हेगारीला आळा बसेल.’ असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुण विद्यार्थ्यांना केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचलन इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सहा.प्रा.डॉ.लालचंद पटले यांनी केले तर आभार इंग्रजी विभाग प्रमुख सहा.प्रा. दीनानाथ पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.