“यशस्वी” उद्योजकांची “यशोगाथा” समजून “आत्मनिर्भर” होण्यासाठी पुढे या खा. उन्मेश पाटील यांचे आवाहन

“यशस्वी” उद्योजकांची “यशोगाथा” समजून “आत्मनिर्भर” होण्यासाठी पुढे या खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

——————————————-
कृषी व महिला उद्योजकता व नाविन्यता परिषदेचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन :
परिषदेत लाभार्थ्यांनी मांडली आपली यशोगाथा
—————————————-
जळगाव — शासकीय योजनांचा लाभ घेताना चिकाटीची आवश्यकता असून यापूर्वी प्रयत्न करूनही योजनेचा लाभ मिळत नसल्याने नाराजी होते. मात्र आपले प्रयत्न अपुरे न सोडता ज्या उद्योजकांनी परिश्रम घेऊन आपला उद्योग व्यवसाय यशस्वी करुन दाखविला आहे त्यांच्या “यशस्वी उद्योगाची यशोगाथा” समजून आपण देखील शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज जळगाव येथे केले.
कृषी व महिला उद्योजकता नावीन्यता परिषदेचे उद्घाटन खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रशासन व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा आयोजित या परिषदेला लाभार्थ्यांचा भरगच्च प्रतिसाद लाभला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर,कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, प्रकल्प विशेषज्ञ पोकरा संजय पवार, परिक्षाविधि अधिकारी अक्षयजी सुभद्रा (आयपीएस),उपवनसंरक्षक विवेक हौशिंग,जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, तेलबिया संशोधन केंद्र प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजीव पाटील, कृषी विज्ञान केंद्र ममुराबादचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक महेश महाजन,स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर अमित कुमार, आयडीबीआय बँकेचे रिजनल मॅनेजर प्रफुल्ल अपराजित, जैन इरिगेशनचे डॉ.बी डी जडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सौरभ पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक राजेंद्र डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार राजु मामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जागृती सुरंगे (ऑइल इंडस्ट्रीज) विद्यानंद आहिरे (मध उत्पादन) संगीता मगरे (भाजीपाला चहा पावडर व्यवसाय )छाया जंजाळकर (भोजनालय व्यवस्थापन) यांच्यासह विविध यशस्वी उद्योजकांनी आपली यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रास्तविक तर कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी आभार मानले. प्रनील चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी परीषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
खासदारांनी केले स्त्री शक्‍तीचे कौतुक
कोरोनानंतर पहिल्यांदा जिल्हा नियोजन सभागृह खच्चून भरले असून आजच्या या परिषदेत उद्योजक, व्यावसायिक महिला भगिनींचा उत्साह ओसंडून वाहत आहे याचा आनंद आहे.*”शिकलेली आई घरादाराला पुढे नेई”* हा सुविचार आपल्या सर्वांना ठाऊक असुन त्याचा प्रत्यय आजच्या उपस्थित स्त्री शक्तीकडे पाहून दिसून येतो. महिला उद्योग व्यवसायासाठी व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत असून *आत्मनिर्भर समाज होण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असून उपस्थित सर्व स्त्री शक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. अशी भावना खासदार उन्मेशदादा पाटील* यांनी यावेळी व्यक्त केली.