महिला दिन की महिला दीन?? प्रश्न एका युवतीचा….कु.चेतना रणदीप हिरे
पाचोरा – ८ मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि समाजातील योगदानाचा गौरव केला जातो. विविध कार्यक्रम, भाषणे, सन्मान समारंभ यांद्वारे महिलांचा गौरव केला जातो. पण या सर्व सोहळ्यांच्या पलीकडे जाऊन जर आपण वास्तवाकडे पाहिले, तर अजूनही अनेक ठिकाणी महिला खऱ्या अर्थाने सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगत आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो.
एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देतो, महिलांच्या यशाचा अभिमान बाळगतो; पण दुसरीकडे उरलेले ३६४ दिवस अनेक महिलांना अन्याय, अत्याचार आणि भेदभाव सहन करावे लागतात. समाजातील पुरुषप्रधान विचारसरणी अजूनही पूर्णपणे बदललेली नाही. अनेक ठिकाणी महिलांना आजही “चूल आणि मूल” यापुरतेच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
आजच्या काळात महिला शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या करत आहेत, विविध क्षेत्रात मोठे यश मिळवत आहेत. तरीसुद्धा घरातील सर्व जबाबदाऱ्या मात्र तिच्याच खांद्यावर टाकल्या जातात. नोकरी करूनही घरातील स्वयंपाक, मुलांचे संगोपन, कुटुंबाची काळजी या सर्व गोष्टी तिच्याच वाट्याला येतात. त्यामुळे तिला दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते.
काही जुने रूढी आणि परंपरा अजूनही महिलांच्या प्रगतीस अडथळा ठरत आहेत. अनेक महिलांना आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागतो. समाजात आजही महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येतात बलात्कार, छेडछाड, कौटुंबिक हिंसा अशा घटना महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात. अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये पीडित महिलेला न्याय मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो.
सर्वात दु:खद बाब म्हणजे, एका बाजूला आपण स्त्री-पुरुष समानतेची भाषा करतो; पण दुसऱ्या बाजूला अजूनही मुलगी गर्भात आहे म्हणून गर्भपाताच्या घटना घडताना दिसतात. मुलगा-मुलगी समान आहेत असे आपण म्हणतो, पण घरातील कामे मात्र अनेकदा फक्त मुलीलाच करायला लावली जातात. हीच मानसिकता बदलणे आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.
खरा महिला सन्मान म्हणजे फक्त एक दिवस कार्यक्रम करून त्यांचा गौरव करणे नव्हे. महिलांना सुरक्षित वातावरण, समान संधी, आदर आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे हे खरे सक्षमीकरण आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळाली, त्यांना योग्य आधार आणि प्रोत्साहन मिळाले, तर समाजाचा आणि देशाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.
म्हणूनच महिला दिन फक्त एक दिवसापुरता मर्यादित न राहता, प्रत्येक दिवशी महिलांना सन्मानाने वागणूक देणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांच्या अधिकारांचा आदर करणे हेच खऱ्या अर्थाने “दररोज महिला दिन साजरा करणे” होय.
समाजाची खरी प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा प्रत्येक महिला सुरक्षित, सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगू शकेल.
कु. चेतना रणदीप हिरे
साहित्य तृतीय वर्ष (मानसशास्त्र विभाग)
श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा

























