मढीच्या कानिफनाथ यात्रेत साध्या वेशातील पोलिस पथके तैनात करून रेकाॅर्ड वरील गुन्हेगारांना शोधून जेरबंद करू,जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची ग्वाही

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथिल कानिफनाथ यात्रेत साध्या वेशातील पोलिस तैनात करून रेकाॅर्ड वरील सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करू अशी ग्वाही अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी दिली.पाथर्डी शहरातील गोरे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रीक्षेत्र मढी,मायंबा, वृद्धेश्वर या तिन्ही देवस्थानच्या विश्वस्त मंडळ आणि सर्व सरकारी खात्याचे खाते प्रमुख अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.घार्गे साहेब पुढे म्हणाले की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय साधून करंजी घाट,वृद्धेश्वर घाट,मायंबा घाटातील वाहतूक व्यवस्था जाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भाविकांच्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत.बीड अहिल्या नगर घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लक्ष घालून वनवे तयार करू.मागिल वर्षी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याही पेक्षा जास्त प्रमाणात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विषेश प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मढी येथील चैतन्य कानिफ नाथांच्या यात्रेसाठी देशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात यात्रेशी संबंधित सर्व सरकारी यंत्रणांनी सेवाभावी पद्धतीने काम करून यात्रेच्या कामाला अग्रक्रम द्यावा असे सुचविण्यात आले.ज्या सरकारी यंत्रणाची कार्य सेवा यात्रा विभागात आहे, त्या सर्व यंत्रणांच्या सरकारी विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया प्रांत अधिकारी मते साहेब यांनी आगामी पंधरा दिवसांसाठी बंद कराव्यात. मढीच्या यात्रेत कुठल्याही प्रकारची गैरसोय अथवा अनर्थ घडू नये याची जबाबदारी प्रशासन व कान्होबा देवस्थान समिती, आणि ग्रामपंचायत मढी यांनी समन्वय साधून पार पाडावी.यंदा मुक्त द्वार म्हणजे समाधी स्पर्श दर्शनाचा कालावधी वाढविण्यात आल्याने भाविकांची मोठी गर्दी होणार आहे अशी माहिती शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस व पाथर्डीच्या आमदार राजळे यांनी या यात्रे बाबतचा आराखडा तयार केला होता. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू साहेब, प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब, तहसीलदार डॉ.उद्धव नाईक, मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव मरकड,वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पालवे,मायंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, पाथर्डीच्या गटविकास अधिकारी संगीता पालवे,अंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश साबळे साहेब इत्यादी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मढी ग्राम पंचायतीच्या वतीने माजी सरपंच संजय मरकड यांनी विविध प्रकारच्या सूचना मांडून पार्कींग व्यवस्था गडाच्या पायथ्याशी असावी अशी सुचना मांडली. तिन्ही देवस्थानच्या अध्यक्षांच्या म्हणण्या नुसार सर्वाधिक मोठी समस्या म्हणजे वाहतूकीमुळे होणारी वाहनांची कोंडी,पार्किंग व्यवस्था व अरुंद रस्त्याची दुरवस्था आहे.वृद्धेश्वर देवस्थान समितीला गर्दीच्या मानाने पार्किंगसाठी अजिबात जागा नसल्याने प्रांताधिकार्यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत पार्किंग साठी जागा मंदिर परिसरातच उपलब्ध करून द्यावी,अशी सूचना आमदार राजळे यांनी स्थानिक महसूल विभागाला केली आहे.ज्या देवस्थानच्या मंदिरा सभोवताली परिसरातील ज्या शेतकऱ्यांची उभी पिके आहेत ती काढून घेण्यासाठी यात्रा प्रमुखांनी संबंधितांना सूचना द्याव्यात. अशीही ठोस मागणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी सर्वच विभाग प्रमुखांनी यात्रेसाठी सकारात्मक मानसिकता ठेवावी अशी सुचना देत ही यात्रा म्हणजे राज्यातील प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण यात्रेपैकी एक यात्रा आहे. वाहतूक व्यवस्था आणि पार्किंग साठीचे भूखंड,निश्चित करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसात शासकीय अधिकारी, शेतकरी वर्गाच्या समन्वयातून हे नियोजन पूर्ण केले जाईल. संबंधितांची बैठक घेऊन सर्वच समस्यातून मार्ग काढला जाईल. वाहन चालकाने वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहने पार्किंग केली असतील तर त्यासाठी वाहन खेचून नेणारी यंत्रणा म्हणजे “टोइंग व्हेईकल” ही यंत्रणा यंदा अंमलात आणण्या साठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. एकेरी मार्गाबाबत प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोरपणे अंमल बजावणी करण्यात येईल. जड व अवजड वाहतूक दोन दिवसांसाठी अन्य मार्गावरून वळविण्यात येणार आहे. वृद्धेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांनी देवस्थान ट्रस्टच्या विकासाची केलेली मागणी अत्यंत योग्य असून पार्किंगच्या जागेचा प्रश्न सर्व सरकारी यंत्रणांनी परस्पराशी समन्वय साधून सोडवावा.येत्या एक-दोन दिवसात बीड व अहिल्यानगर जिल्हा अधिकाऱ्यांचे संयुक्त नोटिफिकेशन जारी करण्यात येऊन एकेरी मार्ग, वाहतुकी साठी बंद ठेवण्यात येणारे मार्ग, व पार्किंग साठी ताब्यात घेण्यात आलेल्या जागांची माहिती प्रसिद्धी माध्यमा द्वारे भाविकांना करून दिली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था तपासून घ्यावी.यात्रा कालावधी मध्ये यात्रेशी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तीन पाळ्यांमध्ये ड्युट्या लावाव्यात. यामुळे कामामध्ये सुसूत्रता व तत्परता निश्चित असेल याची खबरदारी घेण्यात यावी.यंदा तीनही देवस्थान समित्या एकत्रित येऊन नियोजन कार्यात सहभागी झाल्याने यंदाची यात्रा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व अधिकाधिक भाविकांचे समाधान करणारी ठरेल असा विश्वास पोलिस अधीक्षक घार्गे साहेब यांनी व्यक्त केला. आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, की अनेक वर्षांपासून राज्यातील विविध भागातील भाविक यात्रा कालावधी मध्ये मोठ्या संख्येने नाथांच्या समाधीला स्पर्श करण्यासाठी येतात. दर्शनासाठी देण्यात आलेला कालावधी अत्यंत कमी पडत असून मुक्तद्वार म्हणजे समाधीला “हस्त स्पर्श दर्शन” हा कालावधी वाढवावा अशी मागणी अनेक भाविक करत होते. प्रत्येक भाविकांची समाधीला स्पर्श करण्याची इच्छा असते त्यामध्ये त्यांचा श्रद्धा भाव सुद्धा मोठा असतो त्यामुळे देवस्थान समितीने मुक्त द्वार दर्शनाचा कालावधी वाढवावा अशी सूचना देवस्थान समितीला केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत देवस्थान समितीने मुक्त द्वार दर्शनाचा कालावधी वाढवल्याने यंदा भाविकांच्या गर्दीचा मोठा उच्चांक होण्याची शक्यता आहे. मढी यात्रा व अन्य राज्यस्तरीय देवस्थानांमुळे पाथर्डी तालुक्याची राज्यभर सर्वत्र ओळख आहे. सर्व भाविकांची सेवा करण्याची संधी आपल्या तालुक्याला मिळते हे सुद्धा मोठे पुंण्याचे काम आहे.आमदार सुरेशअण्णा धस यांच्या मागणी नुसार तीनही देवस्थान समित्यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती.परंतू आमदार धस यांच्या कुटुंबीयांच्या अकस्मात कारणांमुळे ते या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत असे आमदार राजळे यांनी सांगितले.या सर्व देवस्थानांमुळे तालुक्यात मोठी आर्थिक ऊलाढाल होते. यात्रेमध्ये दरवर्षी पार्किंग व वाहतूक कोंडीची तक्रार मोठ्या प्रमाणात असते. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना आरोग्य , पिण्याचे पाणी, पार्किंग व्यवस्थेमध्ये पुरेसे विद्युतीकरण, याचीही पूर्तता करावी. रुग्णवाहिका, अग्निशामक दल यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या यंत्रणांना सहकार्य करण्याचे आदेश द्यावेत. मोठी गर्दी होणार असे गृहीत धरून संरक्षण यंत्रणांनी अगोदरच मोठा वाढीव अधिकारी वर्ग व वाढीव बंदोबस्त द्यावा. उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे.भाविकांना दर्शन रांग, पार्किंग एरिया व जेथे शक्य असेल तेथे ग्रामपंचायत व देवस्थान समितीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तीनही देवस्थान समित्यांनी आवश्यकता वाटल्यास स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. रात्रीच्या वेळी गर्दी व विविध मार्गाने होणारी वाहतूक पाहता गुन्हेगारी प्रतिबंधक यंत्रणा सतर्क करण्यात यावी.तीनही ग्रामपंचायतींनी तात्पुरत्या स्वरूपात पोलीस चौकीसाठी पोलिसांना जागा व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि महिला पोलिसांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे.कारण दरवर्षी मढी मायंबाचा यात्रा महोत्सव साजरा झाल्या नंतर याच डोंगर परीसरात असलेल्या खोल दरीत अनेक मृतदेह किंवा प्रेताची सापळे उशिराने आढळून येतात त्यादृष्टीने पोलीसांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.अन्न भेसळ व औषध प्रतिबंधक विभागाने दुधाचे पदार्थ,शीतपेये यांची अग्रक्रमाने तपासणी करावी. सर्व निकषांचे पालन होते की नाही याची खात्री करावी.अन्न भेसळ व औषध प्रशासनाचे पथक प्रभावीपणे कार्यरत होण्याची आवश्यकता आहे.आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारून भाविकांची विशेषतः महिलांची गैर सोय दुर करण्याची गरज आहे.उन्हाळ्याचे दिवस,यात्रेत होणारी गर्दी, यामुळे एखाद्या दूषित पदार्थामुळे मोठी विषबाधा होऊ नये याची सरकारी अधिकारी वर्गाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.सर्वच व्यवस्था अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावी या भावने बरोबरच सर्वच देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांनी सुद्धा या यात्रेकरूंच्या सेवेसाठी आपला अमूल्य वेळ द्यावा.देवदर्शना साठी महत्त्वाच्या व्यक्ती येणार असतील तर त्यांचेही अगोदरच नियोजन करावे.परस्पर समन्वय व यात्रेतील सेवाभाव जपला तर यंदाची यात्रा अविस्मरणीय ठरेल असा विश्वास व्यक्त करत सर्वाधिक मागणी असलेला पत्र्याचा तांडा ते माणिकदौंडी रस्ता हा आगामी नियोजनात घेऊन त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला जाईल.अशी माहिती आमदार राजळे यांनी दिली.मायंबा देवस्थानला पाथर्डी शहरासह पूर्व भागाला जोडणारा अत्यंत कमी अंतराचा हा रस्ता दुपदरीकरण व मजबुती करणासाठी अग्रक्रमाने पूर्ण होणे अशी अनेक वर्षांची भाविकांची मागणी आहे.ती आमदार राजळे यांनी लक्ष घातल्याने नजीकच्या काळात पूर्ण होणार आहे. या यंत्रणेशी संबंधित असलेल्या कर्मचारी व अधिकारी व विश्वस्तांनी आपले फोन सतत संपर्क क्षेत्रात कसे राहतील याची दक्षता घ्यावी अशी सूचना आमदारांनी केली आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब, सूत्रसंचालन प्राचार्य अजय भंडारी व तर आभार शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू साहेब यांनी मानले.यावेळी पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब,शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब,गोपनीय विभागाचे प्रमुख नागेश वाघ, भगवान सानप, अंभोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश साबळे साहेब आणि नगर, पाथर्डी,शेवगाव तालुक्यातील पोलिस खात्यातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शेवटी नगरच्या उपस्थित पत्रकारांनी मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाची दुकाने लावू नयेत असा आदेश माजी सरपंचांनी काढला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आदर करून देशातील सर्व सामान्य जनतेसाठी घटनेत स्वातंत्र्य,समता, आणि बंधुता ही नितीमुल्ये घालून दिली आहेत.ती या निर्णयामुळे कुठेतरी पायदळी तुडवली जात आहेत.असे आम्हाला वाटते, कायद्याचे रक्षक म्हणून तुमची भूमिका काय ? असा प्रश्न उपस्थित करताच या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन ” यात्रेत मुस्लिम समाजाची दुकाने लावावीत की,लावू नये” या प्रश्नाचे काहीच उत्तर न देताच पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब बाजूला झाले.

























