शिकाउ अनुज्ञप्तीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येणार वैद्यकीय व्यावसायिकांनी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

शिकाउ अनुज्ञप्तीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येणार
वैद्यकीय व्यावसायिकांनी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

जळगाव, दि. 8 – शिकाउ अनुज्ञप्ती आधार क्रमाकांचा वापर करुन घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी 14 जून, 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेन्वये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेस मधून स्वयंचलितरित्या घेण्यात येतो. तथापि, सध्या जुन्या प्रचलीत पध्दतीनुसार नमूना क्रमांक. 1 (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र हे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत आहे.
त्याअनुषंगाने नागरिकांचे कार्य फेसलेस व अधिक सुकर होण्याकरीता NIC व्दारे वैद्यकीय प्रमाणपत्र नमूना क्र. 1 (अ) मध्ये अहर्ता प्राप्त डॉक्टरांव्दारे ऑनलाईन पध्दतनीने भरुन अपलोड करण्याची प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. ज्या उमेदवाराचे वय वर्ष 40 पेक्षा जास्त आहे. किंवा ज्यांना परिवहन संवर्गातील अनुज्ञप्ती पाहिजे असेल अशा उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना 1 (अ) अपलोड करणे बंधनकारक आहे.
मोटार वाहन कायदा, 9988 मधील कलम 8 (3) अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 5 (1) अन्वये त्याची अनिवार्यता निश्चित केलेली आहे. त्यानुसार सारथी या संगणकीय प्रणालीत उमेदवाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्यक्ष उपलोड करुन शिकाउ अनुज्ञप्ती प्राप्त करण्याच्या प्रक्रीयेत बदल करण्यात येत आहे.
कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांची एमबीबीएस डिग्री, मेडीकल कौन्सील ऑफ इंडियाचे नोदणी प्रमाणपत्र, क्लिनिकचे किमान चार फोटोग्राफर, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अशा प्रत्येक एमबीबीएस पदवी धारण करणाऱ्या डॉक्टर्स यांना स्वतंत्र युजर आयडी कार्यालयामार्फत देण्यात येईल. संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी लॉगीन करुन अर्जदाराची नियमाप्रमाणे आवश्यक शारिरिक तपासणी करुन नमुना 1 (अ) त्यांच्या स्तरावर प्रमाणित करुन ते अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
ही कार्यप्रणाली सुरु करण्याकरीता कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांनी, त्यांना युजर आयडीकरीता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून युजर आयडी प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.