गांधीजींना अभिप्रेत ‘रामराज्या’तील लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न

गांधीजींना अभिप्रेत ‘रामराज्या’तील लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न!
– जळगाव दौऱ्यादरम्यान आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली भावना
– पत्रकार परिषदेत घेतला वर्षभरातील कामगिरीचा आढावा

प्रतिनिधी, जळगाव

समाजातील शेवटच्या घटकालाही समान आणि मानाची वागणूक देणं, म्हणजे रामराज्य अशी संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली होती. या संकल्पनेला जागत माझ्या आमदारकीच्या पहिल्या वर्षात मी त्या पद्धतीने काम करत लोकांना उत्तरदायी राहण्याचा प्रयत्न केला, अशी भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. चार दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आलेल्या आ. तांबे यांनी बुधवारी पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आमदारकीच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणारी ‘आरंभ’ या पुस्तिकेचे अनावरण केले.

सरसकट सर्व मुलींना मोफत शिक्षण द्या!

सध्या राज्यात आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. अनुसूचित जाती व जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थिनींना देखील १०० टक्के सवलत देण्यात आली. या निर्णयामुळे शिक्षणसंस्था किंवा राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडेल का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर बोलताना आ. तांबे यांनी तसा भार पडणार नसून मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे राज्य सरकारचं ध्येय असलं पाहिजे, अशी भूमिका घेतली. तसंच आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा काढून सरसकट सर्व मुलींना मोफत शिक्षण द्यायला हवं, अशी मागणीही त्यांनी केली.

युनोव्हेशन सेंटर लवकरच सुरू होणार!

जळगावमध्ये युनोव्हेशन सेंटरच्या उभारणीसाठी महापालिकेने निविदा काढली आहे. या युनोव्हेशन सेंटरद्वारे जिल्ह्यातील तरुणांना जगाची कवाडं खुली होणार आहेत. शिक्षण, रोजगार, नवउद्यमी, आरोग्य, राजकीय आणि आर्थिक साक्षरता या गोष्टींना या सेंटरमार्फत प्राधान्य दिलं जाईल. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि नवउद्यमी घडवण्यासाठी या युनोव्हेशन सेंटरची मदत होणार आहे. जयहिंद युथ क्लबच्या नावाने जिल्ह्यात २० ठिकाणी या सेंटरची सब-सेंटर कार्यरत असतील, अशी माहिती आ. तांबे यांनी दिली. तसंच जळगावमध्ये गणित विद्यापीठ तयार करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

पर्यटनाला चालना मिळणार!

रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकींचा जन्म चाळीसगाव येथे झाला. एकीकडे राम मंदिर तयार होत असताना रामायणासारखा महान ग्रंथ जगासमोर आणणाऱ्या वाल्मिकी यांच्या नावाने काही करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. महर्षि वाल्मिकी यांच्या नावाने चाळीसगावमध्ये आपण काही उभारू शकलो, तर त्याचा फायदा नक्कीच जिल्ह्याच्या पर्यटनाला होईल, असं आ. तांबे यांनी स्पष्ट केलं.

शिक्षकांना इतर कामाला जुंपू नका!

शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे मराठी शाळांना इंग्रजी शाळांसोबत स्पर्धेत टिकायचं असेल तर दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकाला आपल्या कामाचं समाधान मिळालं पाहिजे. तरच तो कल्पकपणे विद्यार्थी घडवू शकेल. मात्र, आपल्याकडे विद्यादानाचं काम सोडून इतर अनेक सरकारी कामांसाठी शिक्षकांना वेठीला धरलं जातं. त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होतो. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याप्रमाणे परीक्षेदरम्यानचे गैरप्रकारही वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारीही सरकारने हाती घ्यायला हवी, अशी भावना आ. तांबे यांनी व्यक्त केली.