Home जळगाव भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

भेसळ व मानकांबाह्य अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

 

 

जळगाव, दि. 4  : अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाने धडक कारवाई करत विविध ठिकाणांहून भेसळीचा संशय असलेले तसेच मानकांबाह्य अन्नपदार्थ आणि शीतपेयांचा सुमारे २ लाख ३१ हजार ६६० रुपयांचा साठा जप्त केला आहे.

 

अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी भडगाव रोडवरील बांबरुळ फाटा, लोहटार (ता. पाचोरा) येथील एका उत्पादक पेढीची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी उत्पादित लस्सीच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समूह क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. तसेच भेसळीचा संशय असल्याने लस्सीचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. यावेळी २०० मिली क्षमतेची ७५० पॅकेट्स, किंमत २२ हजार ५०० रुपये, जप्त करण्यात आली.

 

तसेच एमआयडीसी, जळगाव येथील फरसाण उत्पादक पेढीची तपासणी केली असता उत्पादन प्रक्रियेत अस्वच्छता तसेच पुन्हा-पुन्हा वापरलेल्या खाद्यतेलाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी वापरलेल्या तेलाचा तसेच जाड व बारीक रतलामी शेवचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित १४.९ किलो रतलामी शेवचा ७ हजार ८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड रोड परिसरात खुल्या स्वरूपात विक्री होत असलेल्या रिफाइन्ड सोयाबीन तेलावरही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा मानकांनुसार पॅकिंग न करता खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे आढळल्याने नमुना तपासणीसाठी घेऊन ३५८ किलो खाद्यतेलाचा ५७ हजार २८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात उत्पादकापर्यंत चौकशी सुरू असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यावसायिकांना कोणत्याही खाद्यतेलाची खुल्या स्वरूपात विक्री न करण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनी केवळ पॅकबंद खाद्यतेलाचीच खरेदी करावी, असेही सांगितले आहे.

 

दरम्यान, ४ जून रोजी एमआयडीसी, जळगाव येथील एका शीतपेय विक्रेता व वितरकाची तपासणी करण्यात आली. ‘ब्लॅक बगीरा’ (Black Bagiraa) या कॅफिनयुक्त कार्बोनेटेड शीतपेयामध्ये लेबलिंगसंदर्भातील त्रुटी व मानकांनुसार नसल्याचा संशय आढळून आल्याने त्याचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तसेच २०० मिली क्षमतेच्या ७ हजार ४४० बाटल्यांचा १ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुढील पुरवठादार व उत्पादकांविरोधात कारवाई करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले असून संबंधित उत्पादनाचा साठा बाजारातून परत मागविण्याबाबत उत्पादकास नोटीस बजावण्यात आली आहे.

 

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे, सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, किशोर साळुंके, योगराज सूर्यवंशी आणि अमोल जगताप यांनी सहभाग घेतला.

जिल्ह्यात कुठेही भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

 

Don`t copy text!