Home महाराष्ट्र जालना-खामगाव व जालना-जळगाव रेल्वेसोबत भोकरदन-बुलढाणा रेल्वे मार्गाची मागणी

जालना-खामगाव व जालना-जळगाव रेल्वेसोबत भोकरदन-बुलढाणा रेल्वे मार्गाची मागणी

जालना-खामगाव व जालना-जळगाव रेल्वेसोबत भोकरदन-बुलढाणा रेल्वे मार्गाची मागणी

 

पारध शाहूराजे मार्गे रेल्वे सुविधा झाल्यास ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना : सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड

 

पारध/प्रतिनिधी — मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या जालना-खामगाव तसेच मराठवाडा आणि खानदेश ला जोडणाऱ्या जालना-जळगाव रेल्वे मार्गासोबत भोकरदन-बुलढाणा असा स्वतंत्र रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावा, तसेच हा रेल्वे मार्ग पारध शाहूराजे,धाड पिंपळगाव रेणुकाई, भोकरदन मार्गे नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी पारध शाहूराजे येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी शासन आणि रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या रेल्वे मार्गामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

महेंद्र बेराड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना, भोकरदन, बुलढाणा, खामगाव आणि जळगाव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन घेतले जाते. विशेषतः मिरची, मका, सोयाबीन, कापूस आणि इतर नगदी पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वाहतूक सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास शेतमाल कमी वेळेत आणि कमी खर्चात मोठ्या बाजारपेठेत पोहोचवणे शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.

 

सध्या ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च होतो. रेल्वे मार्ग सुरू झाल्यास कमी खर्चात, सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, बुलढाणा आणि इतर शहरांमध्ये जाणे अधिक सोयीचे होईल.

 

महेंद्र बेराड यांनी पुढे सांगितले की, रेल्वे मार्गामुळे परिसरातील दळणवळण व्यवस्था मजबूत होऊन व्यापाराला चालना मिळेल. नवीन उद्योगधंदे उभे राहतील, बाजारपेठांचा विस्तार होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळेल. ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतराचे प्रमाणही कमी होऊ शकते.

 

भोकरदन-बुलढाणा रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भातील संपर्क अधिक मजबूत होणार असून दोन्ही विभागांतील आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल. पारध शाहूराजे, पिंपळगाव आणि परिसरातील नागरिकांनी देखील या मागणीला मोठा पाठिंबा दर्शवला आहे.

 

शासनाने या रेल्वे मार्गाचा गांभीर्याने विचार करून तातडीने सर्वेक्षण व पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी केली आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Don`t copy text!